Mumbai : बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त ११ जणांना अटक

विमान कंपनीत (एअरलाइन) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Mumbai : बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त ११ जणांना अटक
Mumbai : बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त ११ जणांना अटक
Published on

मुंबई : विमान कंपनीत (एअरलाइन) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी थेट उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे छापा टाकून एका बोगस कॉल सेंटरचा थरारक पद्धतीने भंडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईतील मानखुर्द परिसरातील एका महिलेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काही अज्ञात व्यक्तींनी तिला एका नामांकित खासगी विमान कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. भरती प्रक्रियेच्या नावाखाली आरोपींनी तिला वेगवेगळ्या बँक खात्यांवर सुमारे २.५ लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, पैसे भरल्यानंतरही नोकरी मिळाली नाही आणि आरोपींनी संपर्क साधणेही बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या कारवाईत ११ जणांना अटक केली असून, घटनास्थळावरून ९ लॅपटॉप, १३ मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे साहित्य, कागदपत्रे जप्त केली आहेत.

डेहराडूनमध्ये छापा

मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता, या रॅकेटची पाळेमुळे थेट डेहराडूनमध्ये असल्याचे समोर आले. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने तातडीने उत्तराखंड गाठले आणि तेथील एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकला. या छाप्यात नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणारे एक मोठे बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे उघडकीस आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in