नोएडा : गणेशोत्सवादरम्यान स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या इसमाला अवघ्या २४ तासांत शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. अश्विन कुमार सुप्रा (५०) असे आरोपीचे नाव असून तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता आलेल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स अॅप क्रमांकावर आलेल्या या संदेशामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी केली असता तो संदेश नोएडा येथून पाठवण्यात आल्याचे तांत्रिक तपासाद्वारे निष्पन्न झाले.
मुंबईत गोंधळ माजवण्याच्या उद्देशाने खोडसाळपणे हा संदेश पाठविल्याची कबुली त्याने दिली. संदेश पाठवण्यात आलेला मोबाईलही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त लखमी गौतम, अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राज तिलक रोशन आणि त्यांच्या पथकाने तपासकामात सहभाग घेतला.
आरोपीने व्हॉट्सॲपवर मुंबई पोलिसांना पाठवलेल्या धमकीच्या संदेशात लिहिले होते की, 'लष्कर-ए-जिहादीचे १४ दहशतवादी मुंबईत घुसले आहेत. दहशतवाद्यांनी ३४ ४०० किलो वाहनांमध्ये आरडीएक्स बसवले आहेत. ते एक मोठा स्फोट करणार आहेत, ज्यामध्ये एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो.'
धमकी मिळताच, मुंबई पोलिसांनी 'हाय अलर्ट' जाहीर केला आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि इतर सुरक्षा एजन्सी देखील सतर्क होत्या. तपासानंतर, मुंबई गुन्हे शाखेने नोएडा गाठले आणि गौतम बुद्ध नगर परिसरातून सेक्टर-७९ मधील एका सोसायटीमधून आरोपीला अटक केली.
आरोपीला मुंबईला आणले
गुन्हे शाखेने आरोपीला नोएडा येथून मुंबईला आणले असून पोलिसांनी आरोपीचा फोन आणि सिम कार्ड जप्त केले आहे. याशिवाय त्याच्याकडून ४ सिम कार्ड होल्डर, ६ मेमरी कार्ड होल्डर, एक सिम स्लॉट एक्स्टर्नल, दोन डिजिटल कार्ड जप्त करण्यात आले आहेत.