

मुंबई : बँक ऑफ इंडियाच्या जागेचे भाडे तब्बल ४७ वर्षे थकवणाऱ्या आणि त्या जागेत अनधिकृत पोटभाडेकरू ठेवणाऱ्या भाडेकरूला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. आपली जागा एकाकडून दुसऱ्याकडे अनधिकृतपणे हस्तांतरित होताना मालक हताशपणे पाहू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि याचिकाकर्त्या भाडेकरूला मूळ जागा मालक असलेल्या बँक ऑफ इंडियाने बजावलेली निष्कासनाची नोटीस योग्य ठरवली. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा निकाल दिला.
पुणे शहरातील सदाशिव पेठ येथील एका दुकानाच्या जागेवरून ही कायदेशीर लढाई सुरू होती. तब्बल ४७ वर्षे भाडे न भरणाऱ्या आणि अनधिकृतपणे पोटभाडेकरू ठेवणाऱ्या याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या १२० चौरस फुटांच्या गाळ्यामध्ये दत्तात्रय डोईफोडे हे मूळ भाडेकरू होते. १९९२ मध्ये विश्वास कृष्णराव गांगुर्डे यांनी मूळ भाडेकरूकडून हा व्यवसाय आणि भाडेपट्टा विकत घेतल्याचा दावा केला होता. मात्र, बँकेने त्याला अनधिकृत ठरवून नोटीस बजावली होती. या प्रकरणात याचिकाकर्त्याने १९७२ पासून जागेचे भाडे भरलेले नव्हते.