Mumbai : शिंपोली गावदेवी मैदानात खासगी शाळेच्या कामाला सुरुवात; रहिवाशांचा २४ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली गावदेवी मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आता आरपारची लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानाचे आरक्षण बदलून तेथे खासगी शाळा उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
Mumbai : शिंपोली गावदेवी मैदानात खासगी शाळेच्या कामाला सुरुवात; रहिवाशांचा २४ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
Mumbai : शिंपोली गावदेवी मैदानात खासगी शाळेच्या कामाला सुरुवात; रहिवाशांचा २४ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
Published on: 

मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली गावदेवी मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आता आरपारची लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानाचे आरक्षण बदलून तेथे खासगी शाळा उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. मैदान वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनांपलीकडे काहीच हाती न लागल्याने शिंपोली गावदेवी मैदान बचाव कृती समितीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे, तर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मीरा कामत यांनी २४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मैदान बचावाचा लढा आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शिंपोली गावदेवी मैदान हे बोरीवली पश्चिम परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक मोकळे ठिकाण आहे. लहान मुले, स्थानिक खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे मैदान एकमेव आधार ठरत आहे. नागरिक येथे खेळण्यासाठी, व्यायामासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र, या मैदानाचे आरक्षण बदलून तेथे खासगी शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण आराखडा २०३४ मध्येही या जागेचे मैदान म्हणून आरक्षण दर्शवण्यात आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. असे असतानाही प्रशासकीय काळात आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

मैदानात शाळेच्या कामासाठी लावण्यात आले पत्रे

मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत शिंपोली गावदेवी मैदान बचाव कृती समिती स्थापन केली. समितीच्या प्रतिनिधींनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यावेळी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी यांच्याकडेही दाद मागण्यात आली. त्यांनीदेखील तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. उलट मैदानात शाळेच्या कामासाठी पत्रे लावण्यात आल्याने आश्वासनांचे नेमके फलित काय, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)