१६९ वर्षे जुन्या भायखळा स्थानकाची जागतिक पटलावर दखल; मिळाला हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

मुंबई ही आपल्या सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक जडणघडणीसाठी ओळखली जाते. येथील वास्तूंच्या बांधकामाची चर्चा ही नेहमी सातासमुद्रापार होते.
१६९ वर्षे जुन्या भायखळा स्थानकाची जागतिक पटलावर दखल; मिळाला हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार
@AshwiniVaishnaw

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच. याशिवाय, मुंबईला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तूंची रचना आणि बांधकाम याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. अशीच दखल १६९ वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाचीदेखील घेतली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत या स्थानकाचे पुनर्संचयनाचे काम उत्कृष्ट आणि दर्जात्मक केल्याने युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार या स्थानकाला प्राप्त झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.

गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा स्थानकाला ओळखले जाते. गेल्या ३ वर्षात या वास्तूची केलेली देखरेख, लहानमोठे बदल आणि पुनर्संरचना कामासाठी युनेस्कोकडून भायखळा स्थानकास पुरस्कार जाहीर झाला. भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नेतृत्त्वात आणि बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने हे काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in