

मुंबई : अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील पाच नामांकित उच्चभ्रू क्लबचे एफएसएसएआय परवाने तातडीने निलंबित केले आहेत.
'एफडीए' आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २७ जुलै रोजी मारलेल्या अचानक तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेत मोठ्या त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
एफडीएने परवाना निलंबित केलेल्या संस्थांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया' (सीसीआय), आरके जुहू जिमखाना, अर्पणा जुहू जिमखाना, वांद्रे येथील 'एमआयजी क्रिकेट क्लब' आणि 'विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब' यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे मुंबईच्या क्लब तसेच हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
त्याशिवाय गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला परवान्याशिवाय अन्न व्यवसाय चालवल्याबद्दल व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असून, अन्य एका आस्थापनाला सुधारणा नोटीस पाठवण्यात आली आहे. दर्शनी भाग चांगले मात्र गटार यंत्रणा बिकटयातील अनेक वास्तू ८० ते ९० वर्षे जुन्या असून, त्यांचे दर्शनी भाग चांगले असले तरी गटार यंत्रणा आणि स्वयंपाकघरांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे तपासणीत सहभागी झालेल्या एका वरिष्ठ एफडीए अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईत 'द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'मध्ये (सीसीआय) प्रचंड अस्वच्छता, थंड खोल्यांमध्ये अन्नावर पाण्याचे थेंब पडणे, बुरशी आलेल्या भाज्या आणि थेट जमिनीवर ठेवलेली भांडी आढळली. त्यानंतर सीसीआयने आपले स्वयंपाकघर आणि बेकरीचे काम तात्पुरते बंद केले आहे.
स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये 'नेब्युला केटरिंग सर्व्हिसेस' ही अनधिकृत संस्था वैध परवान्याशिवाय काम करत असल्याचे स्पष्ट झाले. आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना आणि व्हिलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्येही निकृष्ट स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळले. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी राज्यभरात अशी तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहील, असे एफडीएने स्पष्ट केले.
त्यामुळे भेसळखोर आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक दुकाने, आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात येत असून, काही आस्थापनांना थेट टाळे ठोकले आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उपहारगृहावर कारवाई
दुसरीकडे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान उपहारगृहात एक्सपायर झालेला अन्नसाठा आढळून आला. तसेच अन्न हाताळणी, साठवणूक आणि परिसरातील स्वच्छता नियमांनुसार नसल्याचे निदर्शनास आल्याने एफडीएने उपहारगृहाचा परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळेही एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणांमध्ये काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गंभीर त्रुटी: अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत करण्यात आलेल्या या तपासणीत झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव, बुरशीजन्य व कालबाह्य अन्नपदार्थ, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाची अयोग्य साठवणूक, तुंबलेली गटारे आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छता अशा अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या.