
मुंबई : मालाड येथील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिचा प्रियकर नसीर नहीम शाह (२७) विरुद्ध मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून त्याने तिची फसवणूक केली. तसेच तिचा दोनवेळा जबदस्तीने गर्भपातही केला होता. मात्र तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
२८ वर्षांची पीडित तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिची नसीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर मैत्री आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अंधेरीतील एका हॉटेलमध्ये अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. त्यातून ती दोनवेळा गरोदर राहिली होती. यावेळी त्याने तिच्याशी लग्न न करता तिच्या मनाविरुद्ध गर्भपात केला होता.