

मेघा कुचिक/मुंबई
मुंबईतील वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी वरळीतील 'वरळी रेसिडेंट्स असोसिएशन' (डब्ल्यूआरए) आणि 'ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट' (एएलएम) यांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो व व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करून त्याचे पुरावे वाहतूक पोलिसांकडे पाठवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 'कॅप्चर, रिपोर्ट, ॲक्ट' (फोटो काढा, तक्रार करा, कारवाई करा) हा या मोहिमेचा मुख्य संदेश आहे.
डब्ल्यूआरएचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी वाहतूक पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर ही संकल्पना मांडली. पोलिसांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून ही मोहीम पुढे नेण्यास सहमती दर्शवली आहे. रहिवाशांनी नियम मोडणाऱ्या वाहनांचा क्रमांक आणि प्रत्यक्ष होणारे उल्लंघन स्पष्ट दिसेल असे फोटो किंवा व्हिडीओ काढायचे आहेत. सिग्नल तोडणे, 'नो-एन्ट्री'मध्ये वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे अशा गंभीर वाहतूक गुन्ह्यांवर यात लक्ष केंद्रित केले जाईल. पाठवलेल्या पुराव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जाईल. उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई (ई-चलान) केली जाईल.
ही मोहीम मुंबईभर राबवा !
ही मोहीम केवळ वरळीपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण मुंबईभर राबवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत शाह यांनी नागरिकांना यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. कल्पना अत्यंत सोपी आहे. जिथे कुठे वाहतूक नियम मोडताना दिसेल, तिथे वाहनाचा नंबर आणि नियमभंग स्पष्ट दिसेल असा फोटो किंवा व्हिडीओ काढा, असे शाह म्हणाले.
जबाबदारीने वागा !
नागरिकांच्या सहभागातून वाहतूक पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सोपे जावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. फोटो किंवा व्हिडीओ काढताना नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी आणि जबाबदारीने वागावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)