

मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवेच्यावतीने रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर तांत्रिक तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, नाताळची सुट्टी असल्यामुळे कुटुंबीयांसह बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून त्यांना रिक्षा आणि टॅक्सी यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्गावरील (मेन लाईन) माटुंगा ते मुलुंड अप व डाऊन फास्ट लाईनवर सकाळी ११ ते दुपारी ३.४५ पर्र्यत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन स्लो लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आपल्या नियोजित थांब्यांवर थांबतील व सुमारे १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० मेगा ब्लॉक तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.१० पर्र्यंत ब्लॉक राहील. एसएमटीहून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल तसेच १०.४८ ते दुपारी ४.४३ दरम्यान गोरेगावकडील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष लोकल, मध्य-पश्चिम मार्गावरून प्रवाशांना परवानगी
ब्लॉकदरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग (मेन लाईन) व पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.