

मुंबई : मध्य रेल्वेने १५ डब्यांच्या लोकल गाड्या चालविण्यासाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शुक्रवारी रात्री टिटवाळा व वासिंद स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
प्लॅटफॉर्म विस्तार कामांसाठी आवश्यक असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी तसेच टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पॉइंट्सवर ओव्हरहेड इक्विपमेंट कार्यान्वित करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.
ब्लॉकची वेळ काय?
शुक्रवारी रात्री २.१० ते ०३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हा ब्लॉक टिटवाळा ते वासिंद अप व डाऊन दोन्ही मार्गांवर असेल. रात्रीच्या वेळी ब्लॉक असल्याने लोकल गाड्यांवर परिणाम होणार नसला तरी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसणार आहे.
कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?
१२१०२ शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ब्लॉक कालावधीदरम्यान वासिंद येथे थांबविण्यात येईल.
१८०३० शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस आसनगाव येथे,
१२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस आटगाव येथे,
२०१०४ भटनी-एलटीटी एक्सप्रेस खर्डी स्टेशनवर थांबविण्यात येईल.
तर, भुसावळ विभागांतर्गत ०१०२६ बलिया-दादर एक्सप्रेस आणि ०११३९ नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस गरजेनुसार योग्य ठिकाणी थांबवण्यात येतील.
याशिवाय, इतर कोणत्याही मेल, एक्सप्रेस किंवा पॅसेंजर ट्रेनला विलंब झाल्यास, परिचालनाच्या सोयीनुसार त्यांचे नियमन केले जाऊ शकते किंवा थांबवले जाऊ शकते. याबाबतची माहिती त्याचवेळी स्थानकांवर जाहीर करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे प्रवाशांना तात्पुरती गैरसोय होईल, त्याबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील कामकाज सुधारण्यासाठी हे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.