Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकल सेवेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे १५ डबा लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. आता लवकरच लाखो प्रवाशांची मागणी पूर्ण होणार आहे. कर्जत, कसारा मार्गावर...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्जत, कसारा स्थानकांदरम्यान १५ डब्यांची लोकल चालविण्यासाठी २७ रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ही कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.

सध्या सीएसएमटी ते डोंबिवली, कल्याण दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या धावतात. तर काही लोकल १२ डब्यांच्या चालतात. या लोकल गर्दीने ओसंडून धावतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकल सेवेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या मार्गावर १५ डबा लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

सध्या सीएसएमटी ते कल्याणदरम्यान १५ डबा लोकलच्या सुमारे २२ फेऱ्या चालतात. तर कल्याण-कसारा, कल्याण-खोपोली दरम्यानच्या स्थानकांच्या फलाटाची लांबी कमी असल्याने १५ डब्बा लोकल चालविण्यात अडथळा येत आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरातील ३४ स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यापैकी २७ स्थानकांचे विस्तारीकरण डिसेंबरअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

माहितीनुसार, २७ पैकी सर्वाधिक स्थानके कल्याण- कर्जत- खोपोली आणि कल्याण- कसारा या मार्गावरील आहेत. सुरुवातीला, सध्या कार्यरत असलेल्या १२ डब्यांच्या काही लोकलचे रूपांतर १५ डब्यांमध्ये केले जाईल आणि नंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढवली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in