

मुंबई: विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीची करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच सीएसएमटी ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हार्बर लाईनवरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही ब्लॉक नसेल तर सर्व उपनगरीय रेल्वे सेवा रविवारच्या नियमित वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत.
मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सीएसएमटीयेथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर लाईन
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी व वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी व वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत सीएसएमटी येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊनवरील सेवा आणि सकाळी १०.४८ ते दुपारी १६.४३ या वेळेत सीएसएमटी येथून गोरेगावकडे डाऊन हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील. पनवेल व बेलापूर व वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सीएसएमटी येथे जाणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत सीएसएमटी येथे जाणाऱ्या 'अप' लाईनवरील सेवा बंद राहतील.