Mumbai : २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; मध्य रेल्वेची १५ दिवस विशेष तपासणी मोहीम; २४.७४ कोटींचा दंड वसूल

दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीच्या काळात मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरोधात १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवली. या कारवाईत २.२७ लाख प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २४.७४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Mumabi : २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; मध्य रेल्वेची १५ दिवस विशेष तपासणी मोहीम; २४.७४ कोटींचा दंड वसूल
Mumabi : २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; मध्य रेल्वेची १५ दिवस विशेष तपासणी मोहीम; २४.७४ कोटींचा दंड वसूलसंग्रहित छायाचित्र | (Photo- Vijay Gohil/FPJ)
Published on: 

मुंबई : दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीच्या काळात मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरोधात १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवली. या कारवाईत २.२७ लाख प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २४.७४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई विभाग आणि मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी सर्वाधिक दंडवसुली केली असून एकूण रकमेच्या सुमारे ४५ टक्के वाटा या पथकांचा आहे.

मुंबई विभाग आणि मुख्यालयाच्या पथकांनी १.०६ लाख प्रकरणांतून ११.०४ कोटी रुपये दंड वसूल केला. भुसावळ विभागात ६४ हजार ३३२ प्रकरणांतून ७.९८ कोटी रुपयांची वसुली झाली. पुणे विभागात २३ हजार १८९ प्रकरणांतून २.६७ कोटी, नागपूर विभागात २४ हजार २५३ प्रकरणांतून २.२५ कोटी, तर सोलापूर विभागात ९ हजार १३४ प्रकरणांतून ७९.३८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

गर्दी लक्षात घेऊन गाड्यांचे नियोजन

सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त २५० हून अधिक विशेष रेल्वे सेवा चालवल्या. या गाड्यांमधून ५६ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. दिवाळी, छठपूजेसह विविध सण आणि सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी होळी, उन्हाळी, गणपती, दसरा, दिवाळी-छठ आणि हिवाळी विशेष गाड्या चालवण्यात येतात.

विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी कारवाई

विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने स्थानकांवरील नियमित तपासणीसोबत अचानक तपासणी, फोर्ट्रेस चेक, सखोल तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा अवलंब केला. मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्यांसह मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरी रेल्वे सेवांमध्येही या मोहिमा राबवण्यात आल्या.

विनातिकीट प्रवास हा अपराध

तिकिटाशिवाय प्रवास करणे रेल्वे कायद्यानुसार दंडनीय असून त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. हा महसूल प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी वापरला जातो. विनातिकीट प्रवासाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट करत मध्य रेल्वेने प्रवाशांना तिकीट घेऊन जबाबदारीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)