63-hour Mega Block: शनिवारी पूर्ण दिवस तर रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत CSMT स्थानकात एकही लोकल नाही येणार

तीन दिवसांच्या ब्लॉक कालावधीत तब्बल ९३० लोकल फेऱ्या रद्द , शनिवार मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी कसोटीचा; मदतीला धावली एसटी...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या प्लॅटफॉर्मच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ब्लॉक जाहीर केला आहे. तीन दिवसांच्या ब्लॉक कालावधीत तब्बल ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तीन दिवसांपैकी शनिवार हा मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कसोटीचा असणार आहे. शनिवारी पूर्ण दिवस-रात्र आणि रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकात एकही लोकल येणार नाही. या लोकल मुख्य मार्गावर भायखळा आणि हार्बर मार्गावर वडाळा स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्रीपासून ते २ जून दुपारी १२.३०पर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. सीएसएमटी) रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला असून यामुळे गावी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. यातच या ब्लॉकचा फटका लोकल सेवेलाही बसणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारी १२.३० पर्यंत मुख्य मार्गावरील लोकल भायखळा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा पर्यंत चालविण्यात येणार आहेत.

शनिवारी पहाटे पासून ते रविवारी दुपारपर्यंत भायखळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकल आणि मेल एक्स्प्रेस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी आणि रविवारी कामानिमित्त दक्षिण मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

गुरुवारीच अनुभवला ब्लॉकचा ट्रेलर, लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क

शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकपूर्वीच मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांना गुरुवारीच ट्रेलर अनुभवण्यास मिळाला. सकाळपासूनच लोकल १५ ते ३० मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना घामाच्या धारा पुसत फलाटांवर लोकलची वाट पाहावी लागली. सीएसएमटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपर अशा प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली होती. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

रद्द करण्यात आलेल्या लोकल फेऱ्या

- ३१ मे रोजी १६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- शनिवार १ जून रोजी ५३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- रविवार २ जून रोजी २३५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावली एसटी, ठाण्यासाठी जादा ५० एसटी

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रवाशांचे हाल होणार आहेत. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळ धावून आले आहे. एसटी महामंडळाने रेल्वेच्या ब्लॉक काळात ५० जादा एसटी गाड्या चालविण्याचे ठरवले आहे.

कुर्ला नेहरुनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी गाड्या चालविण्यात येतील. मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांमध्ये आवश्यक्तेनुसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in