

मुंबई : लोकलसर्कल्सच्या एका सर्वेक्षणानुसार, मुंबईतील जवळपास १० पैकी ६ कुटुंबे (५९ टक्के) त्यांच्या प्राथमिक फळ आणि भाजीपाला विक्रेत्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मते विक्रेते कृत्रिम पिकवणारे घटक किंवा रंगांशिवाय माल विकत नाहीत. या सर्वेक्षणात शहरातील ७,३०० हून अधिक घरगुती ग्राहकांचा समावेश होता. केवळ २१ टक्के लोकांनी आपल्या विक्रेत्यावर विश्वास असल्याचे सांगितले, तर २० टक्के लोकांच्या मनात याबाबत संभ्रम होता.
नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी फळ बाजारातून महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १,३९४ किलो रासायनिकरीत्या पिकवलेली केळी जप्त केल्यानंतर काही दिवसांतच हे निष्कर्ष समोर आले आहेत.
लोकलसर्कल्स हे नागरिकांचे व्यासपीठ आणि जनमत सर्वेक्षण करणारे व्यासपीठ असून ते धोरणात्मक आणि अंमलबजावणीच्या कारवाईसाठी सार्वजनिक आणि ग्राहकविषयक मुद्दे वरच्या पातळीवर मांडण्यास मदत करते.
स्थानिक विक्रेत्यांकडून खरेदी
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मुंबईतील ७५ टक्के कुटुंबे त्यांचे बहुतेक फळे आणि भाजीपाला स्थानिक विक्रेत्यांकडून किंवा शेजारच्या दुकानांतून खरेदी करतात. इतर २४ टक्के लोक संघटित रिटेल आऊटलेट्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात, तर केवळ १ टक्के लोका थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतात.
...तर अधिक पैसे मोजायची तयारी
उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता असूनही ग्राहकांनी सुरक्षित पर्यायांसाठी पैसे मोजण्याची तयारी दर्शवली आहे. सुमारे ७३ टक्के लोकांनी सांगितले की, नैसर्गिकरीत्या पिकवलेली आणि कृत्रिम रंग नसलेली फळे आणि भाज्या खात्रीशीर मिळाल्यास ते त्यासाठी अधिक किंमत (प्रिमियम) देण्यास तयार आहेत. यामध्ये सर्वात मोठा गट (४२ टक्के) १० ते २५ टक्के अधिक पैसे देण्यास तयार होता तर इतर २१ टक्के लोकांनी सांगितले की, जर किमती समान राहिल्या तर ते अशा विक्रेत्याकडे जाणे पसंत करतील. दरम्यान, सर्वेक्षणात कडक नियम करावेत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
कॅल्शियम कार्बाइडचा वापर
फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा (ज्याला 'मसाला' म्हटले जाते) वापर करण्यास प्रतिबंध आहे. तथापि, केळी, आंबा आणि इतर फळे पिकवण्यासाठी एपीएमसी वाशी येथील व्यापारी कथितपणे याचा वापर करतात. एफएसएसएआय नियंत्रित रायपनिंग चेंबरमध्ये १०० पीपीएमपर्यंत इथिलीन वायू वापरण्याची परवानगी देते, परंतु फळांना इथिलीन किंवा इथिफॉनमध्ये बुडवून किंवा स्प्रे करून थेट संपर्कात आणण्यास मनाई आहे.