Mumbai : इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला मोटारसायकल प्रवास; मंत्र्यांनी पायी चालत गाठले मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 'वर्षा ते विधानभवन' हा प्रवास मोटारसायकलने केला.
Mumbai : इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला मोटारसायकल प्रवास; मंत्र्यांनी पायी चालत गाठले मंत्रालय
Mumbai : इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला मोटारसायकल प्रवास; मंत्र्यांनी पायी चालत गाठले मंत्रालय(Photo-X/@Dev_Fadnavis)
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 'वर्षा ते विधानभवन' हा प्रवास मोटारसायकलने केला. मोटारसायकलवर त्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी सोबत केली. मात्र मुख्यमंत्री ज्या दुचाकीवरून आले, त्या दुचाकीची ‘पीयूसी’ संपलेली असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील कागदपत्रे समोर आणली, तर काँग्रेसच्या या टीकेवर भाजपकडून खुलासा करण्यात आला आहे. तर मंत्रालयासमोर शासकीय बंगल्यांमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांनी गुरुवारी पायी चालत मंत्रालय गाठले.

पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना ऊर्जा, इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला फडणवीस यांनी गुरुवारी कृतीत उतरवले. विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या १० सदस्यांचा शपथविधी गुरुवारी विधानभवनात पार पडला. या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला नेहमीचा वाहनांचा ताफा सोडून मोटारसायकलचा पर्याय निवडला. 'वर्षा'वर मोटारसायकलला किक मारून फडणवीस थेट विधानभवनात दाखल झाले. यावेळी फडणवीस यांच्यामागे आशिष शेलार बसले होते.

विधानभवनातील शपथविधी आटोपून फडणवीस मोटारसायकलने मंत्रालयात दाखल झाले. राज्य मंत्रिमंडळ बैठक आणि अन्य शासकीय बैठका आटोपून फडणवीस पुन्हा मोटारसायकलने ‘वर्षा’च्या दिशेने निघाले.

‘पीयूसी एक्स्पायर्ड’वरून काँग्रेसची टीका

मुंबईतील काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या या एन्ट्रीतील मोठी त्रुटी शोधून काढली. ज्या बुलेटवरून मुख्यमंत्री विधानभवनात आले, त्या दुचाकीचे 'प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र' म्हणजेच 'पीयूसी'ची मुदत संपल्याचे कागदपत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत निशाणा साधला.

पुढील सहा महिने मोठा कार्यक्रम नाही

आगामी सहा महिने राज्य सरकार मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. साताऱ्याचा शुक्रवारचा शासकीय कार्यक्रम आधीच नियोजित असल्याने तो रद्द केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्वांचा वाहन ताफा कमी केला असून मंत्र्यांचे परदेश दौरेही रद्द केले आहेत. इतकेच नाही तर मी स्वतः आज मोटारसायकलने प्रवास करून इंधन बचतीचा संदेश दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

वाहन ताफा कमी करण्याची राज्यपालांची सूचना

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याच्या आणि मर्यादित संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. राज्यपालांनी राज्य शासनाच्या गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

गायकवाडांच्या टीकेवर भाजपचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटची ‘पीयूसी’ कालबाह्य झाल्याची बाब वर्षा गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आता भाजपने पलटवार केला. सर्व्हर बंद असल्याने प्रमाणपत्र प्रलंबित आहे, मात्र काँग्रेस खोटं पसरवत आहे, असे उत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in