Mumbai: पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून विक्री; मामा-मामीसह सहा जण अटकेत

पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री करण्याचा वाकोला येथील प्रकार उघडकीस आणून पोलिसांनी मुलीच्या मामा आणि मामीसह सहा जणांना अटक केली. सुटका केलेल्या मुलीला सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Mumbai: पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून विक्री; मामा-मामीसह सहा जण अटकेत
Mumbai: पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून विक्री; मामा-मामीसह सहा जण अटकेत
Published on

मुंबई : पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री करण्याचा वाकोला येथील प्रकार उघडकीस आणून पोलिसांनी मुलीच्या मामा आणि मामीसह सहा जणांना अटक केली. सुटका केलेल्या मुलीला सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.

२२ नोव्हेंबरला मध्यरात्री या मुलीचे अपहरण झाले होते. त्याबाबतचा गुन्हा दाखल होताच परिमंडळ आठमधील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात पथके स्थापन करून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. चौकशीत एक रिक्षा मुलीच्या अपहरणानंतर संशयास्पदरित्या पनवेल येथे जाऊन परत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिक तपासात २१ नोव्हेंबरला रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास एक महिला, एक पुरुष आणि रिक्षाचालक अशा तिघांनी मुलीचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. त्या आरोपींसोबत टेहळणी करण्यासाठी एक बाईकस्वार तसेच आणखी दोन आरोपी होते, असेही उघडकीस आले.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्या रिक्षाचा क्रमांकही पोलिसांच्या हाती आला. त्यामुळे सांताक्रूझ येथील वाकोला परिसरातून रिक्षाचालक लतीफ अब्दुल माजिद शेख याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मुलीचे अपहरण करणारे मुलीचा मामा लॉरेन्स फर्नांडिस आणि मामी मंगल जाधव असल्याचे उघड केले. हे दाम्पत्य मजुरीचे काम करते. त्या मुलीला आपण पनवेल येथे सोडल्याचे रिक्षाचालकाने सांगितले. त्यावरून पोलिसांनी पनवेल येथील विठ्ठलवाडी परिसरातून मामा आणि मामीला ताब्यात घेतले. त्या दोघांनी आपण ती मुलगी करण सणस याला ९० हजार रुपायांना विकल्याची कबुली दिली.

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे रायगड येथील उसर्ली बुद्रुक येथून करण सणस याला ताब्यात घेतले. त्याने मुलीला वृंदा चव्हाण आणि अंजली कोपरगावकर यांना एक लाख ८० हजारांना विकल्याची कबुली दिली. वृंदा चव्हाण हिचा शोध घेतला असता, पनवेल येथील तिच्या घरात मुलगी सापडली. तिची सुटका करून मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in