मुंबईकरांना मिळणार शुद्ध पाणी; भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प

भविष्यातील वाढती लोकसंख्या वाढत्या पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता भांडुप संकुलातील २ हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईकरांना मिळणार शुद्ध पाणी; भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प
मुंबईकरांना मिळणार शुद्ध पाणी; भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प Photo : X (mybmc)
Published on

मुंबई : भविष्यातील वाढती लोकसंख्या वाढत्या पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता भांडुप संकुलातील २ हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कार्यक्षम, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

भांडुप संकुल येथे महानगरपालिकेमार्फत २ हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. एप्रिल २०२९ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करत प्रगतीचा आढावा घेतला. उपायुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्‍तम माळवदे, प्रमुख अभियंता महेंद्र उबाळे यांच्‍यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गुरुत्वाकर्षण प्रणालीतून शुद्धीकरण केंद्रात

मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्‍या मुख्‍यत: दोन प्रणाली आहेत. त्‍यापैकी एका प्रणालीतून तानसा-वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्‍य वैतरणा आणि अप्‍पर वैतरणा या जलाशयांमधील पाणी जलवाहिन्‍यांच्‍या माध्‍यमातून गुरुत्‍वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात आणले जाते. भांडुप संकुलातील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये या पाण्‍यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्‍यात येते. दररोज सुमारे २६०० दशलक्ष लिटर पाणी विविध ठिकाणी असलेल्‍या सेवा जलाशयांमार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्‍यात येते. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्‍या जलशुद्धीकरण प्रकल्‍पाचे बांधकाम सुमारे ४६ वर्षांपूर्वी करण्‍यात आले आहे.

शुद्धीकरणाची क्षमता वाढणार

हा प्रकल्‍प संरचनात्‍मकदृष्‍ट्या कमकुवत झाल्‍याने २ हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्‍प उभारण्‍यात येत आहे. नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पात दररोज २ हजार दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्‍यात येणार आहे.

मुंबईला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा

भांडुप संकुलातील ७.४ हेक्टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित करेल. ज्यामुळे मुंबईला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कामे जलद गतीने सुरू

सद्यस्थितीत माती परीक्षण, खोदकाम, प्रकल्पस्थळास बॅरिकेडिंग, वीजवाहक तारांच्या मनोऱ्यांचे स्थलांतरण, वृक्षारोपण इत्यादी कामांना वेग मिळाला आहे. स्थापत्य कामांसह यांत्रिकी, विद्युत व उपकरणीय कामे ही समांतरपणे सुरू करण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक कामे करण्यावर भर देण्‍याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे गगराणी यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in