

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरे क्षेत्र अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिनांक १ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत 'स्वच्छता मंथन' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड), स्वच्छ निवासी संकुल, स्वच्छ झोपडपट्टी परिसर, स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना, स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी), स्वच्छ शाळा (शासकीय व खासगी), स्वच्छ उपाहारगृह (रेस्टॉरंट), स्वच्छ सामुदायिक शौचालय, स्वच्छ रस्ते/मार्ग, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा, स्वच्छ बाजार परिसर तसेच आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. या विविध गटांसाठी एकूण ४ कोटी २० लाख रुपयांचे पुरस्कार असणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
'स्वच्छता मंथन' स्पर्धेसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सादरीकरण करण्यात आले. ही स्पर्धा प्रशासनाने संपूर्ण मुंबई महानगरात अत्यंत प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत केल्या जात आहेत तसेच विविध बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या दृष्टीने निरनिराळे उपाययोजना उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी 'स्वच्छता मंथन' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
आवाहन काय?
चित्रपट, क्रीडा व अन्य क्षेत्रातील नामांकित व्यक्ती (सेलिब्रिटी), नागरिक आदींनी एखादा परिसर दत्तक घ्यावा आणि इतरांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करावे. गृहनिर्माण संस्थांनी सभोवतालचा परिसर दत्तक घेऊन तेथील स्वच्छता राखावी. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची पद्धत, स्पर्धेसाठीचे विविध प्रवर्ग (कॅटेगरी), पुरस्कारांचा तपशील आणि अन्य तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेत नागरिक, खासगी आस्थापना आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि 'स्वच्छ व सुंदर मुंबई' साठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहनदेखील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले आहे.