

मुंबई : मुंबईतील एका क्लब मालकाच्या घरातून विविध डर्बी स्पर्धांमध्ये जिंकलेल्या चांदी व सोन्याने मढवलेल्या तब्बल ६० ट्रॉफी चोरीला गेल्याची घटना उघडकीला आली आहे. या ट्रॉफींची किंमत सुमारे १५.२४ लाख रुपये आहे. या प्रकरणी घरातील नोकराविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी येथील वेस्टफिल्ड इस्टेट कंपाऊंडमधील एका फ्लॅटमध्ये २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही चोरी झाल्याचे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. शिवेन सुरेंद्रनाथ (५९) हे जाहिरात चित्रपट दिग्दर्शक असून रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड (आरडब्ल्यूआयटीसी) क्लब आणि डायमंड बँड रेसिंग सिंडिकेट प्रा. लि.चे मालक आहेत. त्यांनी नुकतीच या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुरेंद्रनाथ यांनी २००६ पासून विविध प्रतिष्ठित डर्बी स्पर्धा जिंकल्या असून त्या बदल्यात त्यांना चांदी व सोन्याने मढवलेल्या ट्रॉफी मिळाल्या होत्या. नोकर राजेंद्र जेना (४२) हा ओदिशाचा रहिवासी होता. जेना गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या घरी काम करत होता.