
मुंबई : कोस्टल रोडवरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपासून सदर मार्ग दुपारी ४.३० नंतर वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आज दुपारी १२.३० वाजता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा ऑनलाईन होणार आहे.
रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला
लोकार्पण झालेले विहार क्षेत्र आणि पादचारी भुयारी मार्ग हे नागरिकांसाठी शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपासून खुले करण्यात येणार आहेत. सध्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) सकाळी ७.०० ते रात्री १२.०० या वेळेत वाहतुकीसाठी खुला असतो. मात्र, शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला करण्यात येणार आहे. तथापि, ७.५ किलोमीटरच्या विहार मार्गापैकी केवळ ५.३ किलोमीटर — प्रियदर्शिनी पार्कपासून हाजी अलीपर्यंत आणि बडोदा पॅलेसपासून वरळ्यापर्यंत — एवढाच भाग उघडण्यात येणार आहे, कारण उर्वरित भागाचे काम अद्याप बाकी आहे. तसेच, एकूण १९ पादचारी सबवेपैकी केवळ चारच सुरू केले जाणार आहेत.
सायकल ट्रॅकसह दिव्यांगांसाठी व्हिलचेअर सुविधा
नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहार क्षेत्रावर विविध सोयीसुविधा दिल्या आहेत. विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आली आहे. तसेच आसनव्यवस्थेचीही सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र उतार मार्ग (रॅम्प) तयार करण्यात आला आहे.