

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला कोस्टल रोड आता वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. मार्च २०२४ ते मार्च २०२६ या दोन वर्षांत तब्बल ३ कोटी १६ लाख ५९ हजार ३४३ वाहनांनी कोस्टल रोडवरून सफर केली आहे.
आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून सोयीसुविधांमध्ये वाढ करणे काळाची गरज आहे. मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पूल, भूमिगत रस्ते तयार करण्यात येत असून कोस्टल रोड प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे कामाचा ऑक्टोबर २०१८मध्ये शुभारंभ झाला. त्यानंतर २०१९ पासून कोस्टल रोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि १२ मार्च २०२४ पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. कोस्टल रोड प्रवासी सेवेत आल्यापासून वांद्रे ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचा प्रवास सुसाट झाला असून दररोज सरासरी ३२ हजार ४२५ वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे कोस्टल रोड मुंबईकरांसाठी वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी वरदान ठरला आहे. विशेष म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी-लिंकदरम्यान १० किलोमीटरचा प्रवास फक्त ९ मिनिटांत प्रवास करणे शक्य झाले आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पॉइंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाच्या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी मरीन ड्राईव्हदरम्यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटांत होत आहे. वांद्रे येथून दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मुंबईतून वांद्रे सी-लिंकवरून पुढे ये-जा करण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरला आहे.
अशी झाली वाहनांची सफर
मार्च २०२४ ते मार्च २०२६ पर्यंत ३ कोटी १६ लाख ५९ हजार ३४३ गाड्यांनी कोस्टल रोडवर ये-जा केली आहे.
दररोज सरासरी ३२ हजार वाहने
कोस्टल रोडवर १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी दरदिवशी सरासरी दक्षिण दिशेला १९,२०९ आणि उत्तर दिशेला १५,३३० गाड्या धावत होत्या. कोस्टल रोड १५ ऑगस्ट २०२५ नंतर २४ तास खुला केल्यानंतर दरदिवशी सरसरी दक्षिण दिशेला ३२,४२५ आणि उत्तर दिशेला २८,५४६ गाड्या धावत आहेत.