

मुंबई : वांद्रे-वरळी सीलिंक ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या मुंबई सागरीकिनाऱ्यालगत ७० हेक्टरवर हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. एकूण क्षेत्रफळापैकी १५ टक्के जागेवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र १५ टक्के जागेवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने याठिकाणी तिकिटासाठी पैसे आकारण्यात येणार आहे, तर उर्वरित ८५ टक्के क्षेत्र नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या हरितक्षेत्राचा विकास रिलायन्स फाऊंडेशनच्या सीएसआर निधीतून करण्यात येत आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वांद्रे-वरळी सीलिंकच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किलोमीटर लांबीच्या सागरीकिनारा मार्गाच्या दोन्ही बाजूंना हे हरितक्षेत्र विकसित केले जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र महापालिकेच्या निधीवरील भार कमी करण्यासाठी हा प्रकल्प सीएसआर माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि रिलायन्स फाऊंडेशनने त्याची जबाबदारी स्वीकारली.
हरितक्षेत्राच्या आराखड्याबाबत जून २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी तिकीट आधारित मनोरंजनात्मक क्षेत्राचा विस्तार मर्यादित ठेवण्याबाबत न्यायालयाने सूचना केल्या होत्या. त्या स्वीकारत रिलायन्स फाऊंडेशनने किमान ८५ टक्के क्षेत्र नागरिकांसाठी विनामूल्य खुले ठेवण्याचे हमीपत्र दिले.
सिंगापूर-बँकॉकच्या धर्तीवर विकास
रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सिंगापूर आणि बँकॉकमधील आधुनिक हरितक्षेत्रांचा अभ्यास करून त्याच धर्तीवर सागरीकिनारा मार्गावरील हरितक्षेत्र विकसित करण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पांतर्गत फुलपाखरू उद्यान, अत्याधुनिक योगा ट्रॅक, ओपन जिम यांसह विविध सुविधा उभारल्या जाणार आहेत. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात २१ हेक्टर परिसरात भारतातील विविध प्रजातींची ३० हजारांहून अधिक रोपे लावण्याचे काम सुरू झाले आहे.
जल प्रदर्शन (वॉटर शो)
पक्षी निरीक्षण मार्ग
वनविहार टॉय रेल्वे
मुलांसाठी विशेष खेळ क्षेत्र
आर्ट फॉरेस्ट
व्हॉलीबॉल कोर्ट
टर्फ फुटबॉल मैदान
संगम मैदान
बास्केटबॉल कोर्ट
टेनिस कोर्ट
पिकलबॉल कोर्ट
लाइट अँड साऊंड शो
इव्हेंट प्लाझा
पार्कोर जिम
(साहसी क्रीडा)
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)