मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरीकिनारी रस्ता (दक्षिण) अर्थात कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणावरील इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी महानगरपालिकेने या प्रकल्पावर निरनिराळी वैशिष्ट्ये असलेले २३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
मुंबई महापालिकेने बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे मुंबई किनारी रस्त्यावर कोठेही अपघात झाला तर नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती मिळत असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध होते. तसेच दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली, याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीमुळे ठेवण्यात येत आहे. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत चार प्रकारचे वैशिष्ट्य असलेले एकूण २३६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तसेच, कॅमेरे लावल्यामुळे महानगरपालिका तसेच वाहतूक पोलीस यांना स्थानिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लक्ष देता येणार आहे.
वाहन मोजणी कॅमेरे
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्यांचे प्रवेशद्वार व निर्गमद्वारावर एकूण चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भूमिगत बोगद्यांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे, यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
अपघात ओळखणारे कॅमेरे
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बोगद्यांमधील आंतरमार्गिकेजवळ प्रत्येकी ५० मीटर अंतरावर अपघात ओळखणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन्ही बोगदे मिळून असे एकूण १५४ कॅमेरे आहेत. जुळ्या बोगद्यांमध्ये कार अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे आपोआप ओळख करतात. तसेच अशी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षाला तत्काळ सूचना देतात.
वाहन क्रमांक ओळखणारे कॅमेरे
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा नव्यानेच उभारण्यात आला असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची (नंबरप्लेट) नोंद हे कॅमेरे करतात.
निगराणी कॅमेरे
सामान्यपणे वाहतूक सुरक्षेसाठी ७१ निगराणी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फिरवता, झुकवता व झूम करता येतात. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा या कॅमेऱ्यामधील व्हीआयडीएस प्रणाली स्वयंचलित पद्धतीने सदर घटना ओळखते आणि आपोआप त्या घटनेकडे लक्ष केंद्रित करते.