गिरीश चित्रे / मुंबई
वाहतूककोंडीचा 'अलर्ट', अपघातांची नोंद घेणे, स्वयंचलित तपासणी, वाहनांच्या नंबरप्लेटची ओळख पटवणे, पर्यावरणीय बदलांची अचूक माहिती, अशा सुसज्ज दोन भूमिगत मजल्यांसह अत्याधुनिक कमांड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कमांड सेंटरद्वारे वाहतूक पोलीस, फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला जातो. कोस्टल रोडवरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक कमांड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला आहे. टाटा गार्डन, भुलाभाई देसाईजवळील रिक्लेमेशन केलेल्या भूभागावर उभारण्यात आलेले एकात्मिक नियंत्रण व देखरेख केंद्र हे मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. दोन भूमिगत मजले, तळमजला अधिक एक मजला या इमारतीत आधुनिक नियंत्रण व देखरेख प्रणाली बसविण्यात आली आहे.
या केंद्रामध्ये नियंत्रण व डेटा संकलन प्रणाली (एससीएडीए), नियंत्रण पॅनेल आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणालींचे एकत्रीकरण करण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅफिक सेन्सर्स, हवामान केंद्रे, वायू गुणवत्ता मोजणारी उपकरणे आणि बोगद्यांतील वायुविजन यंत्रणा यांच्याकडून मिळणारी माहिती वेळोवेळी तपासली जाते. यामुळे कोस्टल रोडवरील वाहतुकीची स्थिती, पर्यावरणीय परिस्थिती आणि सुरक्षेचे निरीक्षण प्रभावीपणे केले जाते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एकात्मिक नियंत्रण व देखरेख केंद्र, प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीला सक्षम बनवते. या प्रणालीद्वारे वाहतूककोंडी ओळखणे, अपघातांची नोंद घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होते. तसेच वाहतूक सिग्नल, बोगद्यांतील वायुविजन व्यवस्था आणि विद्युत प्रणाली यांचे नियंत्रण परिस्थितीनुसार स्वयंचलित तसेच मानवी पद्धतीने करण्यात येते, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
या प्रकल्पामध्ये प्रतिबंधात्मक देखभाल नियंत्रण प्रणाली समाविष्ट करण्यात आली असून मरीन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सेतूपर्यंत उष्णता वायुविजन वातानुकूल प्रणाली, विद्युत प्रणाली, बोगदा वायुविजन, लाइटिंग आणि पंपिंग यंत्रणांची नियमित देखभाल सुनिश्चित केली जाते. डिजिटल नोंदी, स्वयंचलित तपासणी आणि नियंत्रण व डेटा संकलन प्रणाली अनुरूप अहवाल प्रणालीमुळे यंत्रणांची कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढली आहे. यामुळे सर्व महत्त्वाच्या प्रणाली २४x७ कार्यरत आहेत. एकात्मिक नियंत्रण व देखरेख केंद्र यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम झाले असून, आधुनिक शहरी पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
बॅटरी बॅकअप, डिझेल जनरेटर स्टँडबाय
वास्तव वेळेतील माहितीमुळे (रिअल-टाइम डेटा) वाहतूककोंडी कमी करण्यास, अपघात टाळण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यास मोठी मदत होते. एकात्मिक नियंत्रण व देखरेख केंद्र वीजपुरवठा खंडित झाल्यासही कामकाज अखंड सुरू राहावे यासाठी एक तासाचा बॅटरी बॅकअप तसेच डिझेल जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास वाॅच
एकात्मिक नियंत्रण व देखरेख केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४x७ नजर ठेवली जाते. तसेच स्वयंचलित वाहतूक मोजणी व वर्गीकरण प्रणाली आणि स्वयंचलित वाहन क्रमांक ओळख प्रणालीद्वारे वाहनांची संख्या व नंबरप्लेट ओळखली जाते. हवामान केंद्रे व वायू गुणवत्ता सेन्सर्समुळे पर्यावरणीय बदलांची अचूक माहिती मिळते, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
...त्वरित निर्णय घेणे शक्य
नियंत्रण व डेटा संकलन प्रणालीद्वारे सर्व नियंत्रण प्रक्रिया पार पडत असून, माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करून त्वरित निर्णय घेणे शक्य होते. या केंद्रामध्ये सर्व माहिती एकत्र करून भौगोलिक माहिती प्रणाली आधारित विश्लेषण केले जाते, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक परिणामकारक होते.