Mumbai : 'कोस्टल रोड' प्रकल्प महागला; खर्चात आणखी ६० कोटींची वाढ

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोड प्रकल्प खर्चात आणखी ६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील एन. एस. रोड येथील समांतर रस्त्याच्या कामासाठी खर्च आल्यामुळे कंत्राटदाराला ६० कोटी रुपये द्यावे लागणार आहे.
'कोस्टल रोड' प्रकल्प महागला; खर्चात आणखी ६० कोटींची वाढ
'कोस्टल रोड' प्रकल्प महागला; खर्चात आणखी ६० कोटींची वाढ
Published on

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोड प्रकल्प खर्चात आणखी ६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील एन. एस. रोड येथील समांतर रस्त्याच्या कामासाठी खर्च आल्यामुळे कंत्राटदाराला ६० कोटी रुपये द्यावे लागणार आहे.

बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. प्रकल्पाचा मूळ खर्च १२ हजार ७२१ कोटी ५९ लाख रुपये होता. दरम्यान, २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत प्रकल्प खर्च १४ हजार ९७७ कोटींवर पोहोचला आहे.

प्रियदर्शनी पार्क ते वरळी-सी लिंकपर्यंत कोस्टल रोड प्रकल्प बांधण्यात आला आहे. कोस्टल रोड प्रकल्प मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रिट उड्डाणपूल ते वांद्रे १०.५८ किमीचा हा मार्ग आहे. यातील पहिला टप्पा वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक (वरळी)ते मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी ११ मार्च २०२४ ला वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला. आता हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला खर्चाची पूर्तता करावी लागत आहे.

या प्रकल्पाचा मूळ खर्च हा १२ हजार ७२१ कोटी ५९ लाख ५५ हजार रुपये होता. वस्तू व सेवा करांमुळे प्रकल्प खर्चात वाढ होऊन तो १३ हजार ६० कोटी ९१ लाख ६२ हजार रुपये झाला. या प्रकल्पात पूल उभारणी करताना त्याच्या दोन खांबांमधील अंतराच्या आराखड्यात बदल केल्याने ही वाढ झाली. ही वाढ ९२२ कोटी रुपयांची होती. त्यामुळे प्रकल्प खर्च १३ हजार ९८३ कोटी ८३ लाख रुपयांपर्यंत गेला. समुद्रकिनारी नवीन टेट्रापॉड बसविणे, हाजीअली येथे वाहनतळ बांधणे, प्रकल्पात असलेल्या बोगद्यातील वायुविजन प्रणालीतील बदल, इत्यादीमुळे सहाव्या फेरफारांतर्गंत खर्च थेट १४ हजार ९१७ कोटी १८ लाख रुपये झाला.

मरिन ड्राइव्ह येथील एन. एस. रोड येथील समांतर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्याच्या खर्चाची पूर्तता करावी लागणार आहे. हा वाढीव खर्च साधारण ५९ कोटी ८५ लाखांवर पोहोचला आहे.

यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात झाली वाढ

वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) झालेली वाढ

पुलाच्या दोन खांबांमधील अंतराच्या आराखड्यात केलेला बदल

समुद्रकिनारी नवीन टेट्रापॉड बसवण्याचा खर्च

हाजीअली येथे वाहनतळ उभारणीचा खर्च

बोगद्यातील वायुविजन प्रणालीतील सुधारणा

मरिन ड्राईव्ह येथील एन. एस. रोड समांतर रस्त्याचे काम

logo
marathi.freepressjournal.in