
मुंबई : मुंबई कोस्टल रोड आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मरीन ड्राईव्हपासून वांद्रे-वरळी सीलिंकपर्यंतच्या रस्त्याची कार्यवाही आणि देखभाल दुरुस्तीसाठी ८९ कोटींचा करार मंजूर केला आहे. हा करार पाच वर्षांसाठी असून दरमहा १.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मुंबई पालिकेने १५ ऑगस्ट रोजी कोस्टल रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला. या कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर फारच कमी झाले आहे. दरम्यान शहराच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भर घालत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (आरआयएल) मुंबई कोस्टल रोडच्या बाजूने ७० हेक्टर मोकळ्या जागेचा विकास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रकल्प अंदाजे ४०० कोटींचा असून, त्यामध्ये उद्याने, बागा, सायकल ट्रॅक आणि इतर सार्वजनिक सुविधा असतील.
सध्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) तर्फे केले जात आहे. प्रवाशांना सध्या या रस्त्यावरून प्रवास करताना कोणताही टोल भरावा लागत नाही. दरम्यान, कोस्टल रोडच्या देखभाल करारासाठी पालिकेने सर्वात कमी दर मांडणाऱ्या टॅप टर्बो इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीची निवड केली आहे. या करारात नियमित सफाई, दर तीन महिन्यांनी बोगद्याच्या भिंतींची स्वच्छता, कचरा हटवणे, सीसीटीव्ही, लाईटिंग, रस्त्यावरील खुणा व ड्रेनेज यांची देखभाल यांचा समावेश आहे. याशिवाय, कीटक नियंत्रण, बाह्य इमारतींची स्वच्छता, एचव्हीएसी प्रणाली व उपकरणांची देखभाल, इंटरनेट व आपत्कालीन संवाद प्रणालीचे संचालन अशा विविध कामांचा समावेश असल्याचे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवासाचे अंतर घटले
कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा १०.५८ किमी लांब, ८ लेनचा द्रुतगती मार्ग विकसित करण्यात आला आहे. या मार्गासाठी एकूण १३,९८४ कोटी खर्च झाला आहे. हा नवीन मार्ग वाहनचालकांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. कारण या रोडमुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हे प्रवासाचे अंतर फारच कमी झाले आहे.