कोस्टल रोडची मेची डेडलाईन हुकली; आता 'या' महिन्यापर्यंत प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन

डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रकल्पातील पार्किंग झोन, वरळी ते वांद्रे सी लिंक जोडणीचा दुसरा बो स्ट्रिंग आर्च गर्डर लाँच करणे आदी महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. त्यामुळे मे अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येणारा कोस्टल रोड आता जून अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३ नंतर मे अखेरपर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येण्याची दुसऱ्यांदा डेडलाईन हुकली आहे.

वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान दक्षिण मुंबईतील एक लेन १२ मार्च रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर संपूर्ण कोस्टल रोड मे अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता संपूर्ण कोस्टल रोड जून अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जून अखेरपर्यंत संपूर्ण कोस्टल रोड प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन

दरम्यान, कोस्टल रोडचे २८ एप्रिलपर्यंत ८८.१७ टक्के काम पूर्ण झाले असून अजून १२ टक्के काम पूर्ण होणे बाकी आहे. उर्वरित कामात दुसरा २५ हजार मेट्रिक टन वजनाचा बो स्ट्रिंग आर्च गर्डर समुद्रात बसवणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. पहिला बो आर्च गर्डर लाँच केला, त्यावेळी समुद्रात भरती ओहोटीचे आव्हान नव्हते. परंतु मे महिन्याअखेरीस समुद्रात दुसरा गर्डर लाँच करताना मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मे अखेर नंतर पावसाची चाहूल लागणार असून त्यावेळी समुद्रात दुसरा गर्डर लाँच करणे अतिशय आव्हानात्मक काम असणार आहे. त्यामुळे मे अखेरची डेडलाईन हुकणार आणि जून अखेरपर्यंत संपूर्ण कोस्टल रोड प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली. कोस्टल रोडच्या कामाला वेग येणार तोच मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईच्या विकासाला ब्रेक लागला. कोरोनाचा फटका कोस्टल रोडच्या कामाला ही बसला. मात्र २०२२ मध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारसह पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले. त्यानंतर कोस्टल रोडच्या कामाला वेग आला. सद्यस्थितीत आजपर्यंत ८८.१७ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान , डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईच्या सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे डिसेंबर २०२३ ची डेडलाईन हुकली आणि मे २०२४ ची डेडलाईन जाहीर करण्यात आली. मात्र मे अखेरपर्यंत कोस्टल रोडचे संपूर्ण काम पूर्ण होणे शक्य नसल्याने जून अखेरपर्यंत संपूर्ण कोस्टल रोड मुंबईच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.असं होतंय काम

फेज ४

- १०० टक्के कामाचे नियोजन, पूर्ण - ९५.२२ टक्के

फेज १

- १०० टक्के कामाचे नियोजन, पूर्ण - ८७.९८ टक्के

फेज २

- ९१.५ टक्के नियोजन, पूर्ण - ७९.२ टक्के

दुसरा बो स्ट्रिंग आर्च गर्डर मुंबईत दाखल

हरयाणातील अंबाला येथून दुसरा बो स्ट्रिंग आर्च गर्डर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाला आहे. सोमवारी पहाटे हा दुसरा गर्डर बसवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र मे महिन्याच्या मध्यातच दुसरा बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्यात आला तरीही मे महिन्यात कोस्टल रोड सुरू करणे शक्य होणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in