Mumbai : कोस्टल रोड आजपासून सातही दिवस खुला; पण 'या' वेळेतच करता येणार प्रवास!

‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता’ (दक्षिण) प्रकल्पातील वाहतूक आता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.
कोस्टल रोड
कोस्टल रोड
Published on

मुंबई : ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता’ (दक्षिण) प्रकल्पातील वाहतूक आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंतच कोस्टल रोडवरुन प्रवास करता येईल.

महानगरपालिकेमार्फत हा किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवादरम्‍यान कोस्टल रोड हा दिनांक ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता. आता, २१ सप्टेंबर अर्थात आजपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका तसेच, उत्तरवाहिनी मरीन ड्राईव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in