कोस्टल रोडवरील पादचारी मार्ग जोडणार! ३२५ मीटर लांबीच्या मार्गासाठी BMC खर्च करणार ९.६४ कोटी

कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत असलेल्या पादचारी आणि सायकल मार्गातील तुटलेली कडी जोडण्यासाठी पालिकेने निविदा जाहीर केली आहे. या निविदेनुसार वरळीतील लोटस जेट्टी आणि बडोदा पॅलेस बिल्डिंग यांच्यामधील ३२० ते ३२५ मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडला जाणार आहे.
कोस्टल रोडवरील पादचारी मार्ग जोडणार!
कोस्टल रोडवरील पादचारी मार्ग जोडणार! प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत असलेल्या पादचारी आणि सायकल मार्गातील तुटलेली कडी जोडण्यासाठी पालिकेने निविदा जाहीर केली आहे. या निविदेनुसार वरळीतील लोटस जेट्टी आणि बडोदा पॅलेस बिल्डिंग यांच्यामधील ३२० ते ३२५ मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडला जाणार आहे. या कामासाठी पालिकेला अंदाजे ९.६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

कोस्टल रोडवरील ७.५ किलोमीटरचा महाकाय पदपथ (विहार क्षेत्र) व रस्ता नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून २४ तास खुला करण्यात आला आहे. यामध्ये प्रियदर्शिनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी पर्यंतच्या ५.२५ किमी पट्टा तसेच पूनम चेंबर्स–वरळी बोस्ट्रिंग आर्च ब्रिजदरम्यानच्या भागाचा समावेश आहे. दरम्यान कोस्टल रोडसाठी पुनर्भरण केलेल्या १११ हेक्टर भूभागापैकी ७० हेक्टर जागा खुला परिसर, थीम झोन आणि पादचारी मार्गांसाठी राखीव आहे. यापैकी सद्यस्थितीत पादचारी मार्ग प्रियदर्शिनी पार्क ते लोट्स जेट्टी आणि बडोदा पॅलेस ते जे. के. कपूर चौक, वरळी या दोन तुकड्यांमध्ये विभागला आहे. यामुळे नागरिकांना अखंड मार्ग उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिकेने दोन्ही पट्ट्यामधील ३२५ मीटर अंतर असलेले मार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पादचारी मार्गाची वैशिष्ट्ये -

  • हा संपूर्ण पादचारी मार्ग ७.२५ ते ७.५ किलोमीटर लांबीचा असणार आहे, जो मरिन ड्राइव्हच्या पादचारी मार्गापेक्षा दुप्पट लांब असेल.

  • याची रुंदी ८ ते २० मीटरपर्यंत असणार आहे.

  • या नवीन ३२५ मीटरच्या भागात २ मीटर रुंदीचा सायकल ट्रॅकदेखील प्रस्तावित आहे.

logo
marathi.freepressjournal.in