कोस्टल रोड: दुसरा बोगदा प्रवाशांसाठी सुखद अनुभव; पण दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालकांचा गोंधळ

वरळी नाका आणि हाजी अली येथे जाण्यासाठी लावलेल्या दिशादर्शक फलकांवर बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक अशी नावे देण्यात आली होती. मात्र...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान दुसऱ्या बोगद्यातील वरळीकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. दुसऱ्या बोगद्यातून मंगळवारी एका दिवसांत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १,७७० वाहनांची सफर घडली.

वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक मार्गिकेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान प्रवासासाठी लेन वाहतुकीसाठी खुली झाल्याने वेळेची व इंधनाची बचत होत आहे. मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा ६.२५ किमीचा दुसरा बोगदाही खुला करण्यात आल्यामुळे वरळीपर्यंतच्या ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आता अवघी आठ ते दहा मिनिटे लागणार आहेत.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक लेन १२ मार्च रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर मंगळवारी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालकांचा गोंधळ!

कोस्टल रोडवरून वरळी नाका आणि हाजी अली येथे जाण्यासाठी लावलेल्या दिशादर्शक फलकांवर बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक अशी नावे देण्यात आली होती. मात्र बहुतांशी वाहनचालकांचा या फलकामुळे गोंधळ झाला. नेमका वरळीकडे जाणारा मार्ग कोणता आणि हाजीअली येथे जाणारा मार्ग कोणता असा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे वाहनचालकांकडून तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे कोस्टल रोड प्रशासनाने अखेर दोन्ही दिशादर्शक फलकांजवळ हाजीअली, ताडदेवकडे जाणारा मार्ग आणि वरळीकडे जाणारा मार्ग अशा नामोल्लेखाच्या पाट्या लावल्याने अखेर हा गोंधळ थांबला.

logo
marathi.freepressjournal.in