मरीन ड्राईव्ह ते वांद्रे ८ मिनिटांत; नोव्हेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल

रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिंडेंची महत्त्वपूर्ण माहिती
मरीन ड्राईव्ह ते वांद्रे ८ मिनिटांत; नोव्हेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून हा रोड प्रत्यक्षात मुंबईकरांच्या सेवेत आल्यानंतर रोज ६० हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह-वरळी-वांद्रे सी लिंक हे अंतर फक्त ८ मिनिटांत सर करता येणार आहे. यामुळे ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार असून या प्रकल्पात ४+४ मार्गिका अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच बेस्ट बसेससाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले असून हा कोस्टल रोड टोल-फ्री असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. दक्षिण मुंबई तसेच उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून नोव्हेंबर २०२३पर्यंत हा महत्त्वकांक्षी रोड सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व कोस्टल रोड प्रमुख अश्विनी भिडे यांनी ‘दैनिक नवशक्ति’ला दिली.

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. १२ हजार ९५० कोटी रुपये इतका खर्च कोस्टल रोड प्रकल्पात अपेक्षित असून ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्यानंतर कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असताना मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे. कोस्टल रोडचे आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकाल्पामुळे ३४ टक्के इंधनाची, तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल रोडमध्ये ७० हेक्टर एवढे हरीत क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पात दोन महाकाय बोगदे बांधण्यात येत आहेत. दोन्ही बोगद्यात ३ मार्गिका असणार आहेत. चार मजली इमारतीची उंची असणार्‍या ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाला, तर दुसर्‍या बोगद्याचे २,०७० मीटर पैकी सद्यस्थितीत ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील ८ ते १० दिवसांत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर अंतर्गत कामे पूर्ण करत नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

दुचाकी वाहनांना बंदी

कोस्टल रोड ४+४ लेन असून मध्ये कुठेही उजवे-डावे वळण नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता दुचाकींना प्रवेश बंदी असणार आहे. कोस्टल रोडमुळे पेडर रोड, लाला लजपतराय रोड, भुलाभाई देसाई मार्ग आदी दक्षिण मुंबईतील भागांतील वाहतूक कोंडी फुटणार आहे.

भूमिगत वाहन पार्किंगची क्षमता

अमर सन्स - २५६

महालक्ष्मी मंदिर व हाजी अली - १,२००

वरळी सी-फेस - ४००

सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह

न्यायालयाच्या परवानगीमुळे नागरी सुविधांमधील १,८५६ वाहनांच्या पार्किंगसह प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत फुटपाथ, जेट्टी अशी कामे वेगाने सुरू आहेत.

ही आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये व सुविधा

* देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. बोगदा खोदणारा मावळा टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल २३०० टन आहे. तर व्यास १२.१९ मीटर आहे. तर मावळा मशीनची उंची चार मजली इमारती ऐवढी आहे.

* बस टर्मिनल : वरळी - १

* बस थांबे - ८

* पोलीस चौकी - २ ठिकाणी

* भूमिगत पादचारी मार्ग - १६ ठिकाणी

* बोगद्यात अत्याधुनिक सॅकार्डो नॉझल वायूविजन प्रणाली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in