कोस्टल रोड: मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास जुलैनंतर

कोस्टल रोडच्या कामाला वेग आला असून, जुलैपर्यंत वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
कोस्टल रोड: मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास जुलैनंतर

मुंबई : कोस्टल रोडच्या कामाला वेग आला असून, जुलैपर्यंत वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जुलै अखेर वांद्रे वरळी सी-लिंकचा प्रवास करणे शक्य होणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे फक्त १२ मिनिटांत प्रवास करता येणार आहे.

कोस्टल रोडसह सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते, सखोल स्वच्छता अभियान, मुंबईचे सौंदर्यीकरण आदी कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, डॉ. सुधाकर शिंदे, चक्रधर कांडलकर उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) आदी उपस्थित होते. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ८९.६७ टक्के काम पूर्ण झाले आहे.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी एक वाहिनी जुलै अखेर त्या वाहिनीवरून दक्षिण मुंबईकडे येणारी तसेच उत्तरेकडे जाणारी वाहतूक खुली करण्याचे नियोजन करा, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केली.

दोन खांब्यांमधील अंतर ६० मीटरवरुन १२० मीटरपर्यंत नेण्यात आले. कोळी बांधवांची गैरसोय टळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात मासेमारी करताना कोळी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही यावेळी शिंदे यांनी दिली.

३४ टक्के इंधन, तर ७० टक्के वेळेची बचत!

किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी दूर होणार आहे. यामुळे सुमारे ७० टक्के वेळेची बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. यासह पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पालिका आणि मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in