

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पाच्या भराव कामासाठी खासगी बांधकामांच्या ठिकाणांहून आवश्यक परवानगीशिवाय आणलेल्या उत्खननातील मातीचा वापर केल्याचा आरोप झाल्याने मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एल अँड टी–एचसीसी या संयुक्त उपक्रमाला ७२ तासांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून परवानगी मिळेपर्यंत अनधिकृत साहित्याचा वापर करून सुरू असलेले भराव काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित साहित्य कंत्राटदाराच्या खर्चाने हटवण्यासह कठोर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला आहे. बांधकाम आणि कचऱ्याची निर्मितीच्या ठिकाणापासून ते अधिकृत विल्हेवाटीच्या ठिकाणापर्यंत वाहतूक नोंदवण्यासाठी पालिकेने (एमडीसीटीएस) पोर्टल सुरू केले आहे.
पाहणीत आढळली गंभीर बाब
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १ ऑक्टोबरला हाजी अली ते पीडीपी गार्डनदरम्यानच्या कोस्टल रोड परिसराची पाहणी केली. त्या वेळी भरावाचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. वाहनांची माहिती आणि वाहतूक चलनांची तपासणी केल्यानंतर भरावासाठी वापरली जाणारी माती मुंबईतील खासगी इमारत बांधकामांच्या ठिकाणांहून आणली जात असल्याचे आढळल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
आवश्यक परवानगीच घेतली नाही
संबंधित विकासक आणि वाहतूकदारांनी उत्खननातील माती वाहून नेण्यासाठी महापालिका किंवा सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप आहे. भरावासाठीचे साहित्य अधिकृत खाणी किंवा मान्यताप्राप्त स्रोतांतूनच आणणे आवश्यक असताना परवानगी नसलेल्या स्रोतांमधून साहित्य वापरणे हे निविदेतील अटींचे उल्लंघन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नियमभंग करणाऱ्या वाहनांना दंड
सोमवार,१२ ऑक्टोबरपासून अधिकृत आणि कार्यरत ट्रॅकिंग यंत्रणेशिवाय बांधकाम व उत्खननातील कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रत्येक नियमभंगासाठी २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. आवश्यक परवानगीशिवाय बांधकामातील माती किंवा राडारोडा वाहून नेणाऱ्या खासगी विकासकांविरोधातही कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.