Mumbai : अधिकाऱ्यांवर कारवाईची पालिकेत मागणी; नौदल तळाजवळ टोलेजंग इमारतीचा वाद

कुलाबा येथील नौदलाच्या तळाजवळ ५०० मीटर टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. नौदलाची परवानगी नसताना पालिकेच्या इमारत विभागाने इमारतीसाठी परवानगी दिलीच कशी. असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सुधार समिती सदस्य सचिन पडवळ यांनी केली...
मुंबई महापालिका
मुंबई महापालिकासंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कुलाबा येथील नौदलाच्या तळाजवळ ५०० मीटर टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. नौदलाची परवानगी नसताना पालिकेच्या इमारत विभागाने इमारतीसाठी परवानगी दिलीच कशी. असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सुधार समिती सदस्य सचिन पडवळ यांनी केली. तर वरळी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एसटीपी उभारणीसाठी आवश्यक जागा कमी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने का घेतला असा हरकतीचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी उपस्थित केला. या दोन्ही गोष्टींचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात येईल, असे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. दरम्यान, हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आल्याचे सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी यावेळी सांगितले.

सुरक्षेला धोका

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे नौदलाच्या तळाजवळ ५०० मीटर अंतरावर २३ मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. तिच्या उभारण्यासाठी नौदलाची परवानगी नसताना पालिकेच्या इमारत विभागाने परवानगी दिली कशीच, यामुळे सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होतो. यासंदर्भात सध्या न्यायालयात प्रकरण आहे. या इमारतीचे बांधकाम हे २०११ पासून सुरू आहे. नौदलाच्या महत्त्वाच्या तळापासून अगदी ५०० मीटर अंतरात उत्तुंग इमारती उभी राहता कामा नये आणि तसा नियमही आहे.

एसटीपीचा मुद्दाही गाजला

वरळीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरूनही ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत महापालिकेला धारेवर धरले. वरळीतील मलनिस्सारण प्रकल्पासाठी (एसटीपी प्लांट) आवश्यक भूखंडाच्या आकारमानात कपात करण्यावरून काँग्रेसने हरकतीचा मुद्दा घेतला. येथील सार्वजनिक सुविधांसाठी विकास योजनेंतर्गंत आरक्षित असलेली सुमारे २७ हजार ७०० चौरस मीटर जमीन सुमारे १७ हजार ७५० चौरस मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी वरळीतील एसटीपी भूखंडाचा गंभीर मुद्दा असल्याचे स्पष्ट केले. महापालिका आयुक्त, अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे स्पष्ट दिसत असून यामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी त्यांनी केली. 

जागा कोणी बळकावल्या?

गेली चार वर्ष पालिकेत निवडून आलेले नगरसेवक नव्हते. तरीही अनेकांनी जागा बळकावल्या, असा आरोप पडवळ यांनी केला. महापालिका अधिकाऱ्यांनी विकासकांसाठी हव्या तशा योजना राबवल्या असा आरोप करून महापालिकेचे अधिकारी त्यावेळी काय करत होते असा सवाल केला. यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पडवळ यांनी केली. 

logo
marathi.freepressjournal.in