
काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेत युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. वीरप्पन गँगचा घोटाळा मी उघड करणार असे म्हणत त्यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना सेंटरला पुरवठा होत असलेल्या वस्तूंच्या पुरवठा बिलांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकारांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार केला असल्याची टीका केली होती. यासंदर्भात, त्यांनी मुंबई आयुक्तांना पत्र लिहिले होते. यानंतर या गोळ्याची चौकशी करणार आदेश मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, "मनसेच्या पाठपुराव्याला यश वीरप्पन गॅंग घोटाळ्याच्या चौकशीचे महानगर पालिका आयुक्तांचे आदेश" त्यामुळे आता युवासेनेतील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा :
कोरोनाकाळात युवासेनेकडून झाला कोटींचा घोटाळा; काय म्हणाले मनसे नेते संदीप देशपांडे?
दरम्यान, संदीप देशपांडे आरोप करताना म्हणाले होते की, "कोरोना सेंटरमध्ये जेवण पुरविणे, लाँड्री, सॅनिटायझर पुरवण्यासारखी कंत्राटे युवासेनेचे पदाधिकारी वैभव थोरातच्या कंपन्यांना देण्यात आली. ही कामे देत असताना त्याच्या कंपनीची पार्श्वभूमी तपासली गेली नाही. मग ही कंत्राटे देण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती? याचा तपास केला पाहीजे." अशी मागणी त्यांनी केली होती.