गिरीश चित्रे / मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला तर समाजवादी पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांची कुठल्याच समितीत वर्णी लागण्याची शक्यता हुकली आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक निवडून आल्याने एका विशेष समितीत बसवण्याचा मान मिळणार आहे. दरम्यान, दोनवरून आठचा आकडा गाठणाऱ्या एमआयएमला काही प्रभाग समितीत अध्यक्ष पद मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात भाजपला ८९, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २९, ठाकरेंच्या शिवसेनेचे ६५, काँग्रेसचे २४, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६, एमआयएमचे ८, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३, तर समाजवादी पक्षाचे २ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला आहे. नियमाप्रमाणे दोनपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले, तर त्या पक्षाला पालिका मुख्यालयात पक्षाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते.
मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने एका अंकावर समाधान मानावे लागले, तर २०१७ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, ९ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत सपलाही जनतेने दोन अंकावरच ठेवले.
त्यामुळे सप, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पालिका मुख्यालयात ना कार्यालय मिळणार ना कुठल्या समितीत वर्णी लागणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक व सपचे नगरसेवक अन्य पक्षाला पाठिंबा देत पालिकेतील घडामोडींचा आनंद लुटता येणार आहे.