Mumbai : काँक्रीटमुळे झाडांना धोका नाही! झाडे पडण्याचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार - अश्विनी भिडे

चेंबूर येथे शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळले आणि विहानचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे झाडांना धोका निर्माण झाला, अशी टीका मुंबई महापालिकेवर होऊ लागली.
Mumbai : काँक्रीटमुळे झाडांना धोका नाही! झाडे पडण्याचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार - अश्विनी भिडे
Mumbai : काँक्रीटमुळे झाडांना धोका नाही! झाडे पडण्याचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार - अश्विनी भिडे
Published on

मुंबई : चेंबूर येथे शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळले आणि विहानचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे झाडांना धोका निर्माण झाला, अशी टीका मुंबई महापालिकेवर होऊ लागली. मात्र काँक्रीटचे रस्ते आणि झाड यात अंतर असते. त्यामुळे काँक्रीट रस्त्यांमुळे झाडांना धोका असे निर्देश आलेले नाही. तरी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठातील काही तज्ज्ञ आता आयआयटी मुंबईची मदत घेणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबई महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालना शेजारील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुंबईत ३० जून ते ६ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पाऊस आणि ५० ते ७० प्रतितास किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात झाडांचे खूप नुकसान झाले. दरवर्षी पावसाळ्यात किंवा वेगवेगळ्या कारणांनी झाडे पडतात. यावर्षी जेवढी वर्षभरात झाडे पडतात, त्याच्या ५० टक्के झाडे ही केवळ एका दिवसात पडली.

२०२२ मध्ये ६५५, २०२३ मध्ये ६८७, २०२४ मध्ये ६५३ आणि २०२५ मध्ये ८५५ झाडे पडली. तर २०२६ मध्ये ८३० इतकी झाडे पडली. ८३० पैकी ४८० झाडे खासगी क्षेत्रातील होती. जेवढी झाडे पडतात, त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट फांद्याही पडतात. यंदा १ हजार २३८ इतक्या फांद्या पडल्या. त्यापैकी ७०९ या खासगी क्षेत्रातील होत्या. भविष्यात झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करण्यात येईल.

मुंबईत २०१८ च्या वृक्षगणनेनुसार २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी रस्त्याच्या दुतर्फा २ लाख झाडे आहेत. रोडलगतची झाडे खूप धोकादायक असतात. अनेक झाडे रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर आहेत. तसेच पाणी वाहून गटारे असतील किंवा इतर वाहिन्या रस्त्याच्या खालून गेल्या आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाते, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवले जातात. त्यामुळे अशा झाडांच्या मुळांना पाणी पाहोचवणे गरजेचे आहे. झाडांची मुळे दूरपर्यंत पसरलेली असतात. त्यामुळे संबंधित झाडांची मुळे कुठपर्यंत पसरलेली असतील, याचा अंदाज घेऊन तिथपर्यंत छिद्रे करून त्यावर जाळी लावून पाणी टाकता येईल का, याबाबतही महानगरपालिकेचा विचार सुरू आहे. असा प्रयोग यापूर्वी मलबार हिल परिसरात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिगत वाहिन्यांची कामांत काळजी घेणार!

अनेक झाडे ५० ते ६० वर्ष जुनी आहेत. त्यांनी मुळे खूप खोलवर गेली आहेत. यासाठी रस्ते बांधत असताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी आमच्या सुनिश्चित कार्यपद्धती ज्या आहेत, त्यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. जर जमिनीखालून विविध यंत्रणांच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्यांची कामे करतानाही याबाबत काळजी घेतली जाणार आहे.

१० लाख ६४ हजार झाडांची लागवड

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून १० लाखांपेक्षा झाडे लावण्यात आली आहेत. तसेच २०१८ च्या गणनेनुसार ३० लाख झाडे आहेत. मुंबईत झाडांची संख्या खूप आहे. वादळात पडलेल्या झाडांच्या मोबदल्यात कुठे आणि कोणती झाडे लावली जाणार, याबाबत काही अभ्यासकांची मते घेतली जाणार आहेत. मुंबईत मियावाकी पद्धतीची १० लाख ६४ हजार झाडांची लागवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एक लाख फांद्यांची छाटणी पूर्ण

जमिनीत खोलवर गेलेल्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच झाडांची शास्त्रोक्तपणे छाटणी करण्याभरही भर देणार आहोत. रस्त्यालगतच्या २ लाख झाडांपैकी १ लाख झाडांची यंदा महानगरपालिकेकडून छाटणी केली आहे. यासोबतच या झाडांचे सर्वेक्षण करून जेथे छाटणीची गरज तेथे ती केली जाईल.

पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘रिसर्फेसिंग’

पूर्व द्रूतगती मार्ग आणि पश्चिम द्रूतगती मार्ग काँक्रीटचे नाहीत, तर ते डांबरी रस्ते आहेत. या महामार्गांवर खड्ड्यांच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या भागांवर आधीच काम केले आहे. खड्डे भरण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला आहे. पावसाळा संपताच या दोन्ही मार्गांचे ‘रिसर्फेसिंग’ केले जाणार आहे, असे अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले.

काँक्रीटच्या रस्त्यांमुळे खड्डे बुजवण्याच्या खर्चात ३५ टक्के बचत

महापालिकेमार्फत मुंबईतील २ हजार ११८ कि.मी. रस्त्यांच्या जाळ्यांचे परिरक्षण केले जाते. ७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी ५७७.४६ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. काँक्रीटीकरण टप्पा-१ मधील ८९.८१ टक्के आणि टप्पा-२ मधील ७३.७२ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. काँक्रीटीकरणामुळे खड्ड्यांच्या समस्या कमी व खड्डे बजुविण्याच्या खर्चात ३५ टक्के बचत झाल्याचे अश्विनी भिडे म्हणाल्या.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in