
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळी येथे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या, विस्तारित मुंबई कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडले जाणे ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते.
इनोवेशन हब होणार!
वैद्यकीय महाविद्यालय उभारली जाणार असून या ठिकाणी इनोवेशन हब होणार आहे. त्यामध्ये संशोधनासाठीच्या सर्व सुविधा असतील. तसेच क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील संशोधन व 'एआय' आधारीत व्यवस्था असेल. तिसऱ्या मुंबईची सध्याच्या मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतूसोबतच सध्या काम सुरू असलेला वरळी-शिवडी लिंक रोड असेल. मुंबईच्या विकासाला आणखी गती देण्याचे काम ही तिसरी मुंबई करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.