

मुंबई : स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा पालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. मार्च २०२६ ते मार्च २०२६ या वर्षभरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तब्बल २,६८७ तक्रारी मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक ई विभागात ३९० तर टी विभागात ३६१ तक्रारी प्राप्त झाल्या.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. मुंबईत सीसी रस्त्यांची कामे, विविध प्राधिकरणाची कामे सुरु असून खोदकामा दरम्यान जलवाहिनीला फटका बसतो आणि जलवाहिनीला गळती लागते. जमिनीखालून जलवाहिनी फुटल्याने मलनिस्सारण वाहिन्यांचे पाणी अनेकदा जलवाहिनीत जाते आणि मुंबईकरांना दूषित पाणीपुरवठा होतो, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांत मिळून वर्षभरात तब्बल २,६८७ तक्रारी प्राप्त झाल्या असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. अनेक भागांत गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी होत असतानाही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
गोकुळधाममध्ये २५ दिवसांपासून त्रास
गोरेगाव पूर्व येथील गोकूळधाम आरएमएस २२ वसाहती असून वसाहत व परिसरात गेल्या २५ दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत वारंवार जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सांगूनही काम होत नसल्याने थेट दुषित पाण्याची बॉटल्सच स्थायी समितीमध्ये दाखवून हे पाणी आपण पिऊ शकाल का सवाल भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी प्रशासनाला केला. प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला इतर नगरसेवकांच्या प्रभागातही अशाप्रकारच्या समस्या असतील जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने निवारण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना केल्या.
दूषित पाण्याच्या तक्रारी
एकूण तक्रारी : २,६८७
सर्वाधिक तक्रारी : ई विभाग – ३९०
दुसऱ्या क्रमांकावर : टी विभाग – ३६१
पश्चिम उपनगरात सर्वाधिक : के/प – २४०
या भागातून दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी
शहर विभाग एकूण : १,२६९
पूर्व उपनगरे : ५१८
पश्चिम उपनगरे : ९००