

अवधूत खराडे / मुंबई
मुंबईत यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यांत ९८ खून झाले असून, यापैकी ११ महिला बळी ठरल्या आहेत, अशी आकडेवारी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत खुनांच्या घटनांमध्ये २० प्रकरणांची वाढ झाली आहे. शहरातील वाढत्या हिंसक गुन्ह्यांबाबत ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
ही आकडेवारी समोर आली आहे ती काही दिवसांपूर्वीच, म्हणजे २४ ऑक्टोबरला झालेल्या कालाचौकीतील हत्या आणि आत्महत्येच्या प्रकरणानंतर. या घटनेत २४ वर्षीय सोनू बराई याने आपली प्रेयसी मनीषा यादव (२४) हिचा चाकूने खून करून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली होती.
अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत मुंबईत ९८ खून आणि २३२ खूनाच्या प्रयत्नांची प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत ७८ खून आणि २४० खूनाच्या प्रयत्नांची प्रकरणे नोंदवली होती. म्हणजेच खुनाच्या प्रयत्नांच्या घटना थोड्या कमी झाल्या असल्या, तरी खुनांमध्ये झालेली वाढ पोलीस विभागासाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यंदा ९८ खुनांपैकी तीन प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. यंदा झालेल्या ११ महिला खून प्रकरणांपैकी १० प्रकरणे पोलिसांनी उकलली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळात १८ महिलांचा खून झाला होता, म्हणजे महिलांच्या हत्यांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येते. गंभीर मारहाणीच्या प्रकरणांत किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी ३,२८२ तर यावर्षी ३,०५४ अशी नोंद आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश खून हे झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांत घडले आहेत.