Mumbai : पवई तलावातील मगर रस्त्यावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून रेस्क्यू, Video

मुसळधार पावसामुळे पवई तलाव तुडुंब भरल्याने मंगळवारी सकाळी सुमारे सात फूट लांब मगर तलावातून बाहेर पडून मोरारजी नगर परिसरातील रहिवासी भागात शिरली.
Mumbai : पवई तलावातील मगर रस्त्यावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून रेस्क्यू, Video
Mumbai : पवई तलावातील मगर रस्त्यावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून रेस्क्यू, Video
Published on

मुंबई : मुसळधार पावसामुळे पवई तलाव तुडुंब भरल्याने मंगळवारी सकाळी सुमारे सात फूट लांब मगर तलावातून बाहेर पडून मोरारजी नगर परिसरातील रहिवासी भागात शिरली. दरगाहजवळ मगर दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संयुक्त बचाव मोहीम राबवत मगरीला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून तिची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर या मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

यापूर्वीही मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये पवई तलावातील मगरींचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तलावातील मगरींना पकडून वीर जिजामाता भोसले उद्यान (राणी बाग) येथे स्थलांतरित करण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती.

राणीबागेची क्षमता अपुरी

सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पवई तलाव पाण्याने पूर्ण भरला असून, भक्ष्याच्या शोधात काही मगरी रहिवासी भागाकडे येण्याच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. याबाबत राणी बाग प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, “पवई तलावात मोठ्या संख्येने मगरी आहेत. वनविभागाने बचाव करून आमच्याकडे सोपविल्यास आम्ही जास्तीत जास्त चार मगरी ठेवू शकतो. त्यापेक्षा अधिक मगरी ठेवण्याची क्षमता सध्या प्राणिसंग्रहालयाकडे उपलब्ध नाही.”

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in