

मुंबई : जगातील सर्वाधिक वर्दळीची धावपट्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) पावसाळापूर्व देखभालीचे काम गुरुवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाले. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा सहा तासांचा तांत्रिक ब्लॉक सायंकाळी ५ वाजता संपला असून, त्यानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे पूर्ववत झाली आहेत. मुंबईत येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या सुरक्षित संचालनासाठी हे काम दरवर्षी हाती घेतले जाते.
या सहा तासांच्या कालावधीत ३,४४८ मीटर लांबीची मुख्य धावपट्टी (०९/२७) आणि २,८७१ मीटर लांबीची दुय्यम धावपट्टी (१४/३२) तांत्रिक तपासणीसाठी बंद ठेवण्यात आली होती. मुंबई विमानतळावरून दररोज सुमारे ९५० विमानांची ये-जा होत असते. पावसाळ्यात विमाने उतरताना धावपट्टीवर घसरू नयेत आणि तांत्रिक बिघाड होऊ नयेत, यासाठी विशेष इंजिनिअरिंग तपासणी करण्यात आली.
धावपट्टीवरील विमानांच्या टायरचे साचलेले रबर काढून टाकणे हे या देखभालीतील सर्वात महत्त्वाचे काम होते. यामुळे विमानांना ब्रेक लावताना आवश्यक घर्षण मिळते. यासोबतच धावपट्टीवरील ३,००० हून अधिक दिवे आणि संबंधित सब-स्टेशन्सचे ऑडिट करण्यात आले. अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी ड्रेनेज यंत्रणेची स्वच्छता करण्यात आली, तसेच कमी दृश्यमानतेच्या काळात माहिती तंत्रज्ञान आणि नेव्हिगेशन यंत्रणा विनाखंड सुरू राहावी, यासाठी केबल नेटवर्कची चाचणी करण्यात आली.
सहा महिनेआधाची तयारी
या कामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एमआयएएल) सहा महिनेआधीच तयारी सुरू केली होती. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना विमान फेऱ्यांचे नियोजन करता येईल. पावसाळ्यातील आव्हानात्मक हवामानात धावपट्टीची पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रतिबंधात्मक देखभाल अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.