

मुंबई : मुंब्रा अपघातप्रकरणी दोन रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन (सीआरएमएस) या संघटनेने गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून सीएसएमटी स्थानकात आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मोटरमनदेखील सहभागी झाल्याने मध्य रेल्वेमार्गावरील लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मुंब्रा दुर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने दुपारपासून सीएसएमटी स्थानकात आंदोलन सुरू केले. या आंदोलनात रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या आंदोलनात मोटरमनही सामील झाले.
आंदोलक कर्मचाऱ्यांनी लोकल व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर उभे राहून घोषणाबाजी सुरू केली. यामुळे सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य आणि हार्बर मार्गावरील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल सेवा ठप्प झाल्याने रेल्वे प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली. तोवर लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
लोकल सेवा ठप्प झाल्याने सीएसएमटी स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती. स्थानकात पाय ठेवण्यास जागा नसल्याने स्थानकाबाहेरही प्रवाशांची गर्दी झाली. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हार्बर आणि मुख्य मार्गावरील लोकल ६.४५ वाजता सुरू झाल्या. तब्बल एक तास सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ ते ७ वर उभ्या असलेल्या लोकलपैकी एक-एक लोकल कल्याण आणि पनवेलच्या दिशेने सुरू झाल्या. परंतु, एक तास उशिरा लोकल धावल्याने टिटवाळा, कसारा, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, पनवेल, वाशी, वांद्रे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्याचप्रमाणे सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या लोकलचेही वेळापत्रक बिघडले.
अनेक स्थानकांतील सेवा ठप्प
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संपामुळे सीएसएमटी, दादर, भायखळा, घाटकोपर, ठाणे आणि कल्याणसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली. यामुळे प्रवाशांना दीड तास स्थानकांवर ताटकळत रहावे लागले.
‘सीआरएमएस’चे नेते विवेक शिशोदिया यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताविषयी आश्वासन दिले आहे. याविषयी उच्चस्तरावर चर्चा केली जाईल, असे सांगितल्यानंतर सायंकाळी ६:४५ वाजता रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या.
सीएसएमटी येथे कल्याणला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत असलेल्या राघव चंद्रा यांनी सांगितले, ‘मी स्थानकावर पोचलो तेव्हा गाड्या थांबलेल्या होत्या आणि फलाट पूर्ण भरला होता. त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.’
डोंबिवलीचे महेश कांबळे यांनी अचानक झालेल्या संपावर टीका करत तो ‘अन्याय्य’ असल्याचे म्हटले आणि हा प्रकार प्रवाशांना ‘बंधक ठेवण्यासारखा’ असल्याचे सांगितले. रेल्वे कामगारांनी दावा केला की, दोन रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात नोंदवलेला गुन्हा हा ‘अन्याय्य आणि निराधार’ आहे. त्या दोन अभियंत्यांचा अपघाताशी काहीही संबंध नाही.
प्रवासी संघटनांकडून निषेध
प्रवासी संघटनांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपाचा तीव्र निषेध केला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई म्हणाले, ‘गर्दीच्या काळात रेल्वे अडवणे अत्यंत निषेधार्ह आहे. हजारो प्रवासी—विद्यार्थी, नोकरीवर जाणारे आणि रुग्णांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. गर्दीमुळे गंभीर सुरक्षेचा धोका निर्माण झाला.’
सँडहर्स्ट रोड येथे रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; तीन जखमी
मुंबई : सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ लोकलने पाच प्रवाशांना धडक दिली. त्यातील चौघांना तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले, असे जे. जे. रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता यांनी सांगितले. तर मुंबई मनपाच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला, दोन जण रुग्णालयात दाखल आहेत, तर एका प्रवाशाने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. मुंबई मनपा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, हेली मोहमाया (१९) या मुलीचा मृत्यू झाला आहे, तर एका मृताची अजून ओळख पटलेली नाही. कैफ चोगले हा मुलगा व खुशबू ही महिला जखमी झाली असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे मार्गातून चालण्यास सुरुवात केली, तेव्हा हा अपघात झाला.