Mumabai: सीएसएमटी स्थानकात तिकीट तपासनीसावर हल्ला; रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

ओळखपत्राची मागणी केल्याने पुरुष प्रवाशाने मारहाण केली, तर सोबत असलेल्या महिला प्रवाशाने शिवीगाळ करून गैरवर्तन केले.
Mumabai: सीएसएमटी स्थानकात तिकीट तपासनीसावर हल्ला; रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा
Mumabai: सीएसएमटी स्थानकात तिकीट तपासनीसावर हल्ला; रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हासंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. संबंधित कर्मचाऱ्याने ओळखपत्राची मागणी केल्याने पुरुष प्रवाशाने त्यांना मारहाण केली, तर सोबत असलेल्या महिला प्रवाशाने शिवीगाळ करून गैरवर्तन केले.

या प्रकरणी ऋषिकेश संजय पवार (२४) आणि निकिता ऋषिकेश पवार (२३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे तिकीट तपासणी कर्मचारी जिग्नेश वसंतलाल भावसार हे रविवारी सायंकाळी ६.५५ ते ७ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ जवळील कॉनकोर्स परिसरात तिकीट तपासणी करत होते. यावेळी त्यांनी एका पुरुष आणि महिला प्रवाशाला तिकीट तपासणीसाठी थांबवले. पुरुष प्रवाशाने आपण रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगितले. पण, त्याचे रेल्वे ओळखपत्र किंवा नोकरीचा वैध पुरावा दाखवण्यास सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना, त्या पुरुष प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यावर शारीरिक हल्ला केला. सोबत असलेल्या महिला प्रवाशानेही त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. या घटनेनंतर, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने, ऋषिकेश संजय पवार (वय २४ वर्षे) आणि निकिता ऋषिकेश पवार (वय २३ वर्षे) या दोन्ही प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे प्रवासी आपण रेल्वे कर्मचारी असल्याचे कोणतेही ओळखपत्र किंवा प्रवासासाठी आवश्यक असलेले वैध अधिकृत कागदपत्र सादर करू शकले नाहीत.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी या प्रवाशांना शासकीय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १३७ (योग्य पास किंवा तिकिटाशिवाय फसवणूक करून प्रवास करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे), कलम १३८ (योग्य पास किंवा तिकिटाशिवाय किंवा अधिकृत अंतरापेक्षा जास्त प्रवास केल्याबद्दल अतिरिक्त शुल्क आणि भाडे आकारणे) आणि कलम १४५ (रेल्वे परिसरात मद्यपान करणे किंवा उपद्रव निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, संबंधित गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११५(२) आणि ३(५) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in