देवश्री भुजबळ / मुंबई
कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे बांधण्यात येत असलेल्या समुद्रभिंतीच्या (बंड वॉल) विरोधातील आंदोलनादरम्यान रविवारी दुपारी मच्छिमार समुदाय आणि कफ परेड रेसिडेंट्स असोसिएशन (सीपीआरए) यांच्यात वाद झाला. बेव्ह्यू मरीना येथे आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमारांनी येऊन घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मच्छिमार नगर येथे बांधण्यात येणाऱ्या बंड भिंतीला सीपीआरएने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते समुद्रातून जमीन भराव केल्यामुळे अतिक्रमणाला चालना मिळते. भिंत उभारण्याऐवजी झोपडपट्ट्यांचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी टेट्रापॉड्स बसवावेत, अशी त्यांची मागणी आहे. एकदा जरी एका इंचाची जमीन भराव करून मिळवली तरी नंतर सरकारकडून अतिक्रमण रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, असे सीपीआरए सदस्यांचे म्हणणे आहे.
भिंत घरांच्या संरक्षणासाठी
सीपीआरए ही मच्छिमार आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या जनतेच्या विरोधात आहे. पावसाळ्यात समुद्राचे पाणी आमच्या घरात शिरते. त्यापासून संरक्षणासाठी ही भिंत बांधली जात आहे, असे रविवारी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेले मच्छिमार समुदायाचे सदस्य प्रसन्न पांडे म्हणाले.
टेट्रापॉड्स बसवा, अतिक्रमण रोखा!
आम्ही शांततेत आंदोलन सभा घेत होतो. त्यावेळी मच्छिमार समुदायाने येऊन झोपड्या पाडण्याच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. प्रत्यक्षात आमच्या चर्चेत झोपड्या हटवण्याचा कोणताही विषय नव्हता. आम्ही फक्त बंड भिंत थांबवून त्याऐवजी टेट्रापॉड्स बसवण्याबाबत चर्चा करत होतो. जमलेली गर्दी एखाद्या राजकीय पक्षाने प्रेरित केली असावी, कारण त्यांना नेमके कशाविरोधात घोषणाबाजी करत होते याची कल्पनाही नव्हती, असे सीपीआरएचे अध्यक्ष डॉ. लॉरा डिसुझा यांनी सांगितले.
४२० मीटरची भिंत
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मच्छिमार नगर ५ येथे ४२० मीटर लांबीचे समुद्रभिंतीचे काम सुरू असून ती पुण्यातील सेंट्रल हायड्रोपॉवर रीसर्च सेंटरच्या आराखड्यानुसार केले जात आहे आणि त्याला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट प्राधिकरणाची एनओसी मिळाली आहे. भिंतीच्या समुद्राकडील बाजूस उतार दिल्याने अतिक्रमण आणि वस्तीचा विस्तारही होणार नाही.
अतिक्रमणाविरोधात आंदोलन
सीपीआरएचे आंदोलन हे मच्छिमार नगर ४ आणि ५ जवळील किनारपट्टीवर होणारे अतिक्रमण, अनावश्यक जमीन भराव, मँग्रोव्हचे नुकसान, बेकायदेशीर जेट्टी बांधकाम आणि किनारपट्टीवर वाढणाऱ्या बहुमजली झोपडपट्ट्यांच्या विरोधात होते. या संदर्भात संघटनेने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीए आयुक्त यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून बांधण्यात येणाऱ्या भिंतीलाही विरोध दर्शवला आहे.