मुंबई : सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० मुळे मुंबईकरांचे तीनशे कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
मुंबईतील नागरिकांची सायबर गुन्ह्याद्वारे फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम बँक खात्यामध्ये गोठवण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिसांनी १७ मे २०२२ पासून ही हेल्पलाइन सुरू केली होती. तक्रारदारांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता एनसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंद करून रक्कम गोठवण्यात येते.
हेल्पलाइन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तक्रारदारांचे १३,१९,४०३ कॉल आले. त्यापैकी सायबरविषयक फसवणुकीच्या एकूण १,३१,२७६ तक्रारी एनसीआरपी पोर्टलवर दाखल करण्यात आल्या. त्यात मुख्यत्वे शेयर ट्रेडिंग, गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन टास्क, ऑनलाइन शॉपिंग, कर्ज, नोकरी फसवणूक अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे.
या तक्रारींची दखल घेत पोलिस पुढील कारवाई करत असल्याने १ जानेवारी ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ११३ कोटी रुपये वाचवण्यात १९३० सायबर हेल्पलाइन पथकाला यश आले आहे. हेल्पलाइन सुरू झाल्यापासूनची वाचवलेली एकूण रक्कम ३०२ कोटींच्या घरात जाते.
जानेवारी २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत ११,०६३ सायबर गुन्हेगारांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत.