
मुंबई : ऊन-पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांना डबा पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या डबेवाल्यांना राज्य सरकारने गणेशोत्सवाआधीच मोठे गिफ्ट दिले आहे. १३५ वर्षांपासून सेवा देणाऱ्या डबेवाल्यांना ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वांद्रे पश्चिम येथे 'डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, योगेश सागर, तमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके उपस्थित होते.
डबेवाला समाजाची निर्व्यसनी, वारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.