

मुंबई : इस्रायल, अमेरिका - इराण युद्ध सुरू झाल्यानंतर देशात एलपीजी गॅसचा तुटवडा भासत आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक शहरांमधील हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. इतकेच नव्हे तर हॉटेलांसह अनेक ठिकाणी खानावळी आणि जेवणाचे डबे पुरविणाऱ्या संस्थांचे, महिला गटांचे तसेच खासगी किचनही बंद देवण्यात आले आहे. या सगळ्याचा फटका मुंबईतील डबेवाल्यांना बसला असून ते मोठ्या संकटात सापडले असून डब्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याने ही सेवा विस्कळीत झाली आहे.
डबेवाल्यांची संख्याही रोडावली
एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे जे ग्राहक पूर्णपणे खानावळ किंवा कम्युनिटी किचनवर अवलंबून होते, त्यांची डब्याची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे अनेकजणांनी डबा बंद केला आहे.मुंबईतील दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, चर्चगेट आ प्रमुख रेल्वे स्थानकांच्या परिसरात रोज सकाळी पांढऱ्या कपड्यात, डोक्यावर गांधी टोपी चढवलेले अनेक डबेवाले दिसत असत.तसेच सायकलवर मोठ्या कौशल्याने डबे अडकवून तेथून पुढे ते कार्यालयात पोहोचवण्याची डबेवाल्यांची धडपड दिसत असे. मात्र आता डबेवाल्यांची संख्या रोडावलेली दिसत आहे.
गॅस टंचाईमुळे खानावळीही संकटात
विशेष म्हणजे टिफीन सेवा देणाऱ्या अनेक खानावळीही गॅस टंचाईमुळे संकटात आल्या आहेत. यापूर्वी एका खानावळीतून रोज १०० ते १२५ लोकांचे जेवण बनविले जात असे, मात्र आता केवळ ४० माणसांचे जेवण बनविले जात आहे.जेव्हापासून खानावळी बंद झाल्या आहेत, तेव्हापासून गआहकांना जेवणाची व्यवस्था अन्यत्र करावी लागत आहे. त्यामुळे डबेवाल्यांबरोबरच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या चाकरमानी ग्राहकांचा खर्चही वाढला आहे.
डब्यांच्या संख्येत कमालीची घट
गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे ग्राहकांच्या संख्येत कमालीची घसरण झाली आहे. पूर्वी हजारो डबे रोज हाताळले जात होते. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा डबेवाल्यांच्या उत्पन्नावर थेट, तत्काळ परिणाम होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत सुरू असलेली डबेवाल्यांची सेवा गॅसच्या तुटवड्यामुळे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणाावर विस्कळित झाली आहे. अनेक खानावळी बंद झाल्यामुळे डब्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने सेवेवर परिणाम झाला आहे, अशी चिंता काही डबेवाल्यांनी व्यक्त केली.