

मुंबई : पादचारी प्रथम अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या एफ-उत्तर विभागातील दादर, माटुंगा, सायन, वडाळा परिसरातील फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणांवर हातोडा चालवला. एफ-उत्तर विभागाने केलेल्या कारवाईत फुटपाथवरील १६३ बेकायदा बांधकामे, १८० बेकायदा फेरीवाले व ९ स्टॉल तसेच तात्पुरत्या शेड जमीनदोस्त करण्यात आल्या.
मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत फुटपाथ आणि सार्वजनिक रस्त्यांवरील १६३ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असून ९ बेकायदा स्टॉल जमीनदोस्त करण्यात आले आहेत. तसेच शेकडो तात्पुरती शेड, फेरीवाले, बाकडे आणि मोबाईल फूड व्हॅन हटवण्यात आल्या.
२७ वेळा विशेष मोहिमा
लखमशी नप्पू मार्ग (एल. एन. रोड), स्वामी वल्लभदास मार्ग, जनरल ए. के. वैद्य मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाऊ दाजी मार्ग, शेख मिस्त्री मार्ग आदी प्रमुख रस्त्यांवर एकूण २७ वेळा विशेष मोहिमा राबवल्या. पदपथांवर ठेवलेल्या बेवारस वस्तू (ऑड आर्टिकल्स) आणि फेरीवाल्यांवरही विशेष कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना चालण्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे.